पिंपरी : महापालिकेने निगडी, यमुनानगरमध्ये उंचवट्यावर घरासाठी २४ तास पाणीपुरवठा रद्द केला होता. या परिसरातील उंचवट्यावर घरे असणा-या परिसरात एक तासही पाणी जात नव्हते. त्यामुळे पालिकेतर्फे यमुनानगरमध्ये २४ तास पाण्याचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, तो सध्या बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून २४ तास पाण्याचा प्रकल्प त्वरित सुरू करावा, अशी मागणी होत आहे. ऐनदिवाळीत आणि पावसाळ्यात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. यमुनानगर परिसराचा २४ तास पाण्याचा प्रकल्प सुरू केला होता. भारतीय जनता पक्षाने हा प्रकल्प बंद केला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. याबाबत शिवसेनेने २४ तास पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासन दाद देत नाही.शिवसेनेच्या शहर संघटक सुलभा उबाळे म्हणाल्या, की त्यामुळे यमुनानगरमधील नागरिकांना पाणी मिळू लागले होते. आता तो प्रकल्प बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.यमुनानगर या परिसरात मध्यमवर्गीय नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश नोकरदार वर्ग आहे. पाणी येण्याच्या वेळेत नागरिक घरी नसतात. त्यामुळे पाणी भरणे त्यांना कठीण होत आहे. संपूर्ण शहरात २४ तास पाण्याचा प्रकल्प राबविण्याचे नियोजन पालिका करीत आहे. असे असताना यमुनानगरमधील प्रकल्प बंद करणे योग्य नाही. यमुनानगरमधील २४ तास पाण्याचा प्रकल्प त्वरित सुरू करण्यात यावा.’’महापालिकेतील सत्तांतराचा परिणाममहापालिकेत सत्तांतर झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे प्राधिकरणातील चोविस तास पाणीपुरवठा योजना गुंडळाली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाने विनाटाकीचे गृहप्रकल्प यमुनानगर येथे बांधले आहेत. तसेच यमुनानगरमध्ये अनेक घरे उंचावर आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. घरामध्ये पाणी वरती चढत नव्हते. त्यासाठी तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा यांनी २४ तास पाण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी यमुनानगरची निवड केली होती. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता.यमुनानगर, प्राधिकरण परिसरात सुमारे वीस हजार नागरिक वास्तव्यास आहे. कामगार, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गी अशा विविध स्तरांतील नागरिक वास्तव्यास आहे. त्यांना समस्येचा सामना करावा लागत आहे.ऐनदिवाळीचा सण तोंडावर आला आहे. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पावसाळा असतानाही पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरूळीत न केल्यास आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
राजकारण २४ तास पाण्याचे , यमुनानगर प्राधिकरण, प्रकल्प बंद केल्याने पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 3:04 AM