पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील साहित्य मतदान केंद्रांवर पोहोच करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) २६४ बस पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे सोमवारी सकाळी काहीप्रमाणात बसफेऱ्यांचे नियोजन कोलमडले. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत असून, यासाठी सोमवारपासूनच निवडणूक विभागाची जय्यत तयारी सुरू आहे. शहराच्या विविध भागांतील ११ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सोमवारी सकाळी मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य पोहोचविण्यात आले. हे सर्व साहित्य व कर्मचारी वर्ग पीएमपी बसच्या साहाय्याने केंद्रावर पोहोचविण्यात आले. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, भोसरी आणि नेहरुनगर अशा तीन आगारांमधून बसगाड्या घेण्यात आल्या. निगडी आगारातील एकूण १८३ पैकी १०३ गाड्या निवडणूक कामकाजासाठी देण्यात आल्या. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सत्रात या आगारातून केवळ ८० गाड्या मार्गावर धावल्या. यासह नेहरुनगर आगारातील ९२ गाड्या निवडणूक कामकाजासाठी सोडण्यात आल्या, तर भोसरी आगारातील ११२ पैकी ६९ बसगाड्या नेमण्यात आल्या होत्या. सोमवारी सकाळच्या सत्रातील बसगाड्या साहित्य वाहतुकीसाठी रवाना झाल्याने अनेक मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोठ्या विलंबाने गाड्या सोडल्या जात होत्या. यामुळे सकाळच्यावेळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची काहीप्रमाणात गैरसोय झाली. (प्रतिनिधी)
निवडणुकीसाठी २६४ पीएमपी बस
By admin | Published: February 21, 2017 2:45 AM