पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र महापालिकेच्या तब्बल २८ शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याचे समोर आले आहे. परिणामी शाळेला कारभारी नसल्याने उपक्रम राबवत असताना अडचणी येत आहेत.
मुख्याध्यापक हा शाळेचा प्रमुख असतो. त्यांच्या अखत्यारितच शिक्षकांची सर्व कामे चालतात. शहरात महापालिकेच्या प्राथमिकच्या १०५ मराठी माध्यमांच्या शाळा आहेत. त्यातील मराठीच्या शाळांसाठी मुख्याध्यापकांची ९५ पदे मंजूर असताना फक्त ६७ मुख्याध्यापक कार्यरत असून २८ पदे रिक्त आहेत. पूर्णवेळ मुख्याध्यापक नसल्यामुळे शाळेतील वरिष्ठ शिक्षकांकडे प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी देऊन काम भागविण्यात येत आहे. नियमाप्रमाणे १०० च्या पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेत मुख्याध्यापक असणे बंधनकारक आहे.
शाळांमध्ये शाळेतील उपशिक्षकांकडे मुख्याध्यापकांचे पदभार दिलेले आहेत. या शिक्षकांनी अशैक्षणिक कामे करायची, शिकवायचे अन व्यवस्थापनही पाहायचे अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिक्षण हक्क कायद्याची येथे पायमल्ली होताना दिसत आहे. शिक्षक भरतीशिवाय प्रश्न सुटू शकत नाही.
एकीकडे महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी अनेक शाळांना मुख्याध्यापक नसल्याने आणि शिक्षकांची कमतरता असल्याने त्याठिकाणी शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी अडचणी येत आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर-
शिक्षक मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे भरती कधी होणार आणि रिक्त जागा कधी भरणार हा प्रश्न आहे. मागील वर्षापासून मुख्याध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांत मुख्याध्यापकांची रिक्त पदे आहेत. शाळांत सध्या प्रभारी मुख्याध्यापक काम पाहात आहेत. त्यांच्याकडूनही चांगले काम सुरू आहे. लवकरात लवकर मुख्याध्यापक भरती करणार आहोत.
- विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त