पिंपरी :पिंपरी-चिंचवड पुणे शाखेच्या सायबर सेलने मोठी कामगिरी केली आहे. रावेत परिसरात ‘मेटल कॉइन्स’मध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून २ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या, वाकड परिसरात बनावट ॲपद्वारे चालणाऱ्या शेअर मार्केटमध्ये ९९ लाख रुपयांची फसवणूक करून रक्कम फॉरेन करन्सीमध्ये रूपांतरित करून देणाऱ्या फॉरेक्स कंपनीच्या संचालक यांना सायबर सेलने अटक केली आहे.
रावेत येथील फिर्यादी हे फेसबुक पाहत असताना त्यांना ‘मेटल कॉइन्स’मध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा मिळेल, अशा आशयाची लिंक दिसली. त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले असता फिर्यादी यांना ‘विनविन कॉर्पोरेशन’ नावाची कंपनी ‘मेटल कॉइन्स’मध्ये गुंतवणूक करून परतावा देते, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी यांना त्या कंपनीमध्ये वेळोवेळी २ कोटी १० लाख रुपये ‘विनविन कॉर्पोरेशन’चे सोनी साह यांनी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवलेली रक्कम अथवा तिप्पट परतावा फिर्यादी यांनी वेळोवेळी मागणी करूनही न दिल्याने फिर्यादी यांनी रावेत पोलिस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडून करण्यात आला. बँक खातेधारक अनिकेत अर्जुन पवार (रा. देवराई सोसायटी, नऱ्हे, पुणे) याच्या नावावर असलेल्या खात्यावर ही रक्कम टाकल्याचे लक्षात आले. त्याच्याकडे तपास केला असता ती रक्कम त्याला त्याचा मित्र व आरोपी रोहित विकास पवार (रा. कोथरूड) याने त्याच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून पाठवले असल्याचे सांगितले. ती रक्कम आरोपी रोहित पवार याने आरोपी मुजफ्फर मकसूद बागवान (रा. कात्रज, पुणे) याला देऊन त्या बदल्यात त्याच्याकडून यूएसडीटी ही क्रिप्टो करन्सी घेतली आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी रोहित पवार व मुजफ्फर बागवान यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करून रावेत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वाकड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फिर्यादी यांची बनावट ॲपद्वारे चालणाऱ्या शेअर मार्केटमध्ये ९९ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी केला. रकमेच्या बदल्यामध्ये गोम्स फॉरेक्स सर्व्हिसेस इंडियाचे प्रो.प्रा. स्टिफन गोम्स (वय ५२, रा. कळवा, ठाणे), चिरायू फॉरेक्स कंपनीचे कमलेश थानाराम माळी (३२, रा. टेंभी नाका, ठाणे वेस्ट) यांनी यूएसडीटी ही फिजिकल करन्सी अनोळखी व्यक्तीला दिली आहे. दाखल गुन्ह्यामध्ये स्टिफन गोम्स व कमलेश माळी यांनी फसवणूक रक्कम आहे हे माहित असून देखील ती स्वीकारून त्या बदल्यामध्ये यूएसडीटी ही करन्सी दिली आहे. त्यावरून गोम्स व माळी यांचा दाखल गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करून वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.