पिंपरी : चिंचवड, मोशी आणि देहूगाव येथे तीन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी तीन लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. चिंचवड - काळभोरनगर येथील घरफोडीप्रकरणी शब्बीर मकबुल मुल्ला (वय ५३, रा. सुर्योदय कॉम्प्लेक्स, काळभोरनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घराचा दरवाजा कुलूप लावून बंद असताना चोरटे कडी कोयंडा तोडून घरात घुसले. बेडरुममधील कपाटातील मंगळसुत्र, अंगठ्या, कर्णफुले असे ६३ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.
मोशीतील घटनेप्रकरणी शरद गोविंद सुर्यवंशी (वय ३९, रा. सेक्टर ६, प्राधिकरण, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुर्यवंशी यांचे सेक्टर सहामध्ये वर्कशॉप आहे. वर्कशाॅप बंद असताना चोरटयांनी कडी-कोयंडा उचकटून आतील टुल बॉक्स, हँड ड्रील मशिन, लॅपटॉप, मोबाईल असा ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.
देहूगाव, माळवाडी येथील चोरीप्रकरणी मच्छिंद्र आण्णा बागव (वय ५०, रा. देहूगाव, माळवाडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बागव यांच्या घराचा दरवाजा कुलूप लावून बंद असताना चोरटे कडी कोयंडा तोडून घरात शिरले. घरातील सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि ७० हजारांची रोकड असा १ लाख ८० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.