राजगुरुनगर : कोयत्याचा धाक दाखवून एकदा जबरी चोरी करणा-या व दोनदा दुचाकी चोरणा-या आरोपीला खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मयूर ज्ञानेश्वर पारधे (वय २२, रा. हवेली) असे आरोपीचे नाव आहे. त्याने तीनही गुन्हे च-होली खुर्द (ता. खेड) परिसरात केले आहेत.२६ एप्रिल २०१५ रोजी आरोपीने घरासमोर लावलेल्या दुचाकीचे हंडेल लॉक तोडून ही दुचाकी चोरली. १३ आॅक्टोबर २०१६ रोजीयाचा परिसरातून दुसºयांदा दुचाकी चोरीचा गुन्हा केला. तसेच १८ आॅक्टोबर २०१६ रोजी रात्री पायी जाणा-या दोन व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या कडील सॅमसंग व ओपो कंपनीचे मोबाईल आणि रोख ६ हजार ५०० रुपये धाक दाखवून काढून घेतले.दरम्यान आळंदी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखला होता. खेड न्यायालयात हा खटला सुरु होता. मयूर पारधे या आरोपीला ३ वर्षे साधा कारावास,१ हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास १५ दिवस अधिक शिक्षा देण्यात आली.सरकारी वकील अॅड. एस. ए. ठोकळ यांनी आरोपीच्या विरोधात खटला चालवला. आळंदीचे पोलीस हवालदार चंद्रशेखर डुंबरे यांनी आरोपीचा पाठपुरावा करून न्यायालयात वेळावेळी हजर केले.
कोयत्याचा धाक दाखवून एकदा जबरी चोरी करणा-यास ३ वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:42 AM