पिंपरी : प्लास्टिक रिसायकलिंग प्लांटमध्ये खूप फायदा आहे. यात गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मे २०२२ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली. या प्रकरणी शनिवारी (दि. १९) चेतन दशरथ गिरी (वय ३०, रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अंकित केतन सावला (३०, रा. मोई, ता. खेड) याच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मित्राने संशयित आरोपी अंकितसोबत फिर्यादीची ओळख करून दिली. या ओळखीतून संशयित आरोपींनी फिर्यादी यांना प्लास्टिक रिसायकलिंग प्लांटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादीच्या मित्रानेदेखील यामध्ये पैसे गुंतवले होते. त्याने त्याचे पैसे काढून घेतले. आरोपींनी फिर्यादी यांना रिसायकलिंगचा प्लँटदेखील दाखवला. फिर्यादीने त्यामुळे विश्वासाने गुंतवणूक केली. मात्र, आरोपींनी फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.