पिंपरी : बेशिस्तपणे वाहन चालवून दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना धडक देऊन काही चालक भरधाव निघून जातात. अपघातानंतर घटनास्थळी थांबून पोलिसांना माहिती देण्याचे तसेच अपघातग्रस्त व जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे औदार्य ते दाखवत नाहीत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत साडेतीन वर्षांत अशा ३११ जणांनी अपघातानंतर पलायन केले. माणुसकी मेलेल्या या वाहनचालकांचे करायचे काय? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.
अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहनचालकांना शोधण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. संबंधित वाहन चालकास लगेच जामीन मिळतो. त्यामुळे संबंधित वाहन चालकाला घटनेचे आणि गुन्ह्याचे गांभीर्य राहत नाही. याला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
३०४ (अ) ऐवजी ३०४ (२) या कलमाचे उपसले हत्यार
अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहन चालकांना जरब बसविण्यासाठी पोलिसांकडून ३०४ (अ) ऐवजी ३०४ (२) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित वाहन चालकाला किंवा आरोपीला जामीन मिळत नाही. तसेच १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अपघातस्थळी थांबून वाहन चालकाने जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करावे. जेणेकरून वेळेत उपचार मिळून त्याचे प्राण वाचू शकतील, तसेच वाहन चालकाने स्वत: पोलिसांना माहिती द्यावी, अशी पोलिसांची अपेक्षा आहे.
नेमका काय फरक आहे कलमांमध्ये...
- ३०४ (अ)
अपघातप्रकरणी ३०४ (अ) प्रमाणे गुन्हे दाखल केले जातात. जो कोणी हयगयीचे अगर निष्काळजीपणाचे, बेदरकारपणाचे कृत्य करून मृत्यू घडवितो; पण तो सदोष मनुष्यवध होत नाही. त्यास कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाची शिक्षा जी दोन वर्षांपर्यंत असू शकेल, अगर द्रव्यदंड अगर दोन्ही शिक्षा होतील, अशी या कलमाची व्याख्या आहे. या व्याख्येनुसार मृत्यू घडविण्यामागे आरोपीचा इरादा किंवा त्याला जाणीव नसते. मात्र, त्याने केलेले कृत्य हे बेदरकारपणाचे, हयगयीचे, निष्काळजीपणाचे असते. हा गुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) यांच्या समोर चालवला जातो.
- ३०४ (२)
पिंपरी-चिंचवड पोलीस ३०४ (२) नुसार गुन्हे दाखल करीत आहेत. ‘जाणीवपूर्वक केलेले कृत्य’ अशी या कलमाची व्याख्या आहे. आपण करीत असलेल्या कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे, याची आरोपीला माहिती असल्यामुळे या कलमाचा वापर प्रभावी ठरत आहे. या कलमाच्या वापरामुळे हा गुन्हा बिगर जामिनाचा व जिल्हा व सत्र न्यायालयात जातो.
अपघातानंतर जखमीला त्वरित रुग्णालयात दाखल केल्यास गोल्डन अवरमध्ये उपचार मिळून त्याचे प्राण वाचू शकतात. मात्र, प्रत्यक्षदर्शी नागरिक मारहाण करीत असल्याचे कारण देऊन अनेक वाहनचालक अपघातानंतर पळून जातात. अशा वेळी पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता वाहनचालक जाणीवपूर्वक पळून गेल्याचे काही प्रकरणांमध्ये तपासातून निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये भादंवि कलम ३०४ (२) चा प्रभावी वापर होत आहे. - मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १
वर्ष - प्राणांतिक अपघात उघड गुन्हे
२०१९ - ३२१ २२७२०२० - २७९ १९२२०२१ - ३१८ २३७२०२२ (जूनपर्यंत) - १७५ १२६