पिंपरी : केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या नवीन सूचनेनुसार कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांबाबत हा निर्णय घेतला आहे. दहा दिवस उपचार झाल्यानंतर चाचणी न घेता घरी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार चोवीस तासांत ३५ रुग्णांना घरी सोडले आहेत. त्यात पुण्यातील चार जणांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालय आणि औंध येथील जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना सोडून दिले आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची लक्षणे आढळलेली व्यक्ती रूग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्या घशातील द्रवांचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यानंतर चौदा दिवस उपचार केले जात होते. त्यानंतर २४ तासांत दोन वेळा चाचणी घेतली जात होती. दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना घरी सोडण्यात येत होते.
आदेश येताच रूग्णांना सोडले घरीकोरोना संदर्भात लक्षणे आणि उपचार या संदर्भात दिवसागणिक आदेश जाहीर केले जात आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी रात्री दिलेल्या नवीन सूचनांनुसार दहा दिवस उपचार केल्यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला घरी सोडण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिचंवड मधील रूग्णालयात उपचार घेणाऱ्या आणि पुण्यातील चार आणि पिंपरी-चिंचवडमधील ३५ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत एकुण १०७ जणांना घरी सोडले आहे. महापालिका रुग्णालयात दाखल एकूण रुग्णांची संख्या १७० झाली आहे.
पुण्यात दिवसाला शंभर रूग्ण वाढीचा आलेख असताना रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ दोनच पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या सक्रिय ५८ जणांवर उपचार सुरू असून आजपर्यंत पुण्यातील चार आणि पिंपरी-चिंचवडमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे.पुण्यातील २० पिंपरीत उपचार घेत आहेत. त्यातील चार जणांचा मृत्यू झालेला असून सात जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत.महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ह्यह्यकेंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार रुग्णांबाबत निर्णय घेण्यात आला. ज्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींवर दहा दिवस उपचार झाल्यानंतर चाचणी न घेता घरी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार रूग्णांना घरी सोडले आहे.