लोणावळा : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्ड व लोणावळा नगरपरिषद यांनी आज लोणावळा शहरात संयुक्त कारवाई मोहिम राबवत १८ दुकानांमधून बेकायदेशिरपणे विक्री करिता ठेवलेल्या ३५० किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. त्यांना ९० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
मागील आठवड्यात लोणावळा शहरातील दहा नामांकित हाॅटेलांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती, यानंतर आज महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाने कारवाई केल्याने लोणावळ्यातील व्यावसायकांचे धाबे दणाणले आहेत. राज्यात सर्वत्र ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घालण्यात आल्यानंतर वर्षभरापुर्वी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करत बेकायदेशिरपणे विक्रीकरिता आणलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. यानंतर देखिल अनेक दुकांनामधून प्रमाणित पिशव्या वा कागदी पिशव्यांऐवजी प्रमाणित नसलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात असल्याची माहिती समजल्यानंतर आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस, नितिन शिंदे, उपेंद्र कुलकर्णी यांच्या पथकासह मुख्याधिकारी सचिन पवार, उपमुख्याधिकारी खाडे, आरोग्य निरिक्षक दिगंबर वाघमारे व नगरपरिषद टिमने शहरातील दुकाने, हाॅटेल, चिक्की विक्रेते अशा सुमारे दोनशे अस्थापनांची तपासणी केली. यामध्ये दोषी आढळलेल्या १८ अस्थापनांकडून प्रत्येकी पाच हजार प्रमाणे 90 हजार रुपये दंड केला. तसेच जप्त केलेले प्लास्टिक नष्ट करण्यात आले. दिवसभर शहरात ही कारवाई सुरु होती.
पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातील दुकाने, हाॅटेल व विक्रेते हे शासनाच्या विविध यंत्रणांच्या रडारवर असल्याने येथिल व्यावसायकांचे धाबे दणाणले आहेत तर विक्रेत्यांनी कायद्याचा भंग न करता नियमांप्रमाणे व्यावसाय करावा असे आवाहन शासकिय यंत्रणांकडून करण्यात आले आहे