पिंपरी : सुपर मार्केट आणि मिनी सुपर मार्केट सुरू करण्याचा बहाणा करून त्यातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. सहा जणांनी मिळून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यातून एका व्यक्तीची ३६ लाख रुपयांची फसवणूक केली. पिंपळे सौदागर येथे ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
दीपक भानुदास घोरपडे (वय ४८, रा. पिंपळे सौदागर) यांनी या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुकेश कुमार त्यागी (रा. उत्तर प्रदेश), मोहम्मद फैजान खान (रा. दुबई), सचिन रामचंद्र सूर्यवंशी (रा. सातारा), संतोष राजाराम पवार, अनिल काशीराम जाधव (दोघे रा. मुंबई) आणि एक महिला यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन कंपनीचे संचालक असल्याचे भासवून फिर्यादीला सुपर मार्केट आणि मिनी सुपर मार्केट सुरू करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन सांगितले. ३५ महिने एक लाख रुपये आणि त्यानंतर ३० महिने ६० हजार रुपये तसेच विक्रीच्या पाच टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादीला गुंतवणूक करण्यास भाग पाडून आरोपींनी फिर्यादीकडून ३६ लाख रुपये घेतले. त्यानंतर कोणताही परतावा न देता फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.