पिंपरी : लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे पिंपरी - चिंचवड शहरात अडकलेल्या मजुरांचा त्यांच्या मूळगावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून सोमवारपर्यंत ३६ खासगी बसने आठशेवर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले आहे. लॉकडाऊन असल्याने परप्रांतीय मजूर, भाविक, पर्यटक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात अडकले होते. तसेच हजारो स्थलांतरित नागरिक निवारा केंद्रात दाखल झाले होते. आम्हाला आमच्या मूळगावी जाऊ द्या, असा तगादा त्यांनी लावला होता. कामधंदा बंद असल्याने त्यांना रोजगार नाही. त्यामुळे हजारो नागरिक आर्थिक अडचणीत आले. परिणामी त्यांचा धीर सुटला. यातील काही नागरिक रस्त्यावर उतरले. हिंजवडी येथील मजूर दोन वेळा रस्त्यावर आले. गावी सोडण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी मजुरांची माहिती संकलित केली. तसेच काही सामाजिक कार्यकर्ते व संघटना यांच्या माध्यमातून खासगी बसचे नियोजन केले. ओडिसा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार, राजस्थान, तेलंगणा व कर्नाटक या राज्यांत ३६ बसमधून आठशेवर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ओडिसा ६, उत्तर प्रदेश २, मध्यप्रदेश २, जम्मू काश्मीर १ अशा ११ बस रवाना करण्यात आल्या आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उत्तर प्रदेश २, जम्मू काश्मीर १ व बिहार २ अशा पाच बस रवाना करण्यात आल्या आहेत. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राजस्थान ३ व तेलंगणा २ अशा पाच बस रवाना करण्यात आल्या आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कर्नाटकात गुलबर्गा येथे ३ बस रवाना करण्यात आल्या आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मध्यप्रदेश येथे दोन बस रवाना करण्यात आल्या आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उत्तर प्रदेश येथे दोन तर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राजस्थानात तीन बस रवाना करण्यात आल्या आहेत. बसच्या क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, तसेच सॅनिटायझरसह सुरक्षा साधनांचा वापर करून खबरदारीचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...........................चाकण व सांगवी येथून आंतरजिल्हा बस चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागात २० खासगी बस रवाना झाल्या. तसेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नांदेड व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा दोन खासगी बस सोडण्यात आल्या. त्यानुसार राज्यातील साडेचारशे नागरिकांना खासगी बसने त्यांच्या मूळगावी जाता आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून ३६ खासगी बसने आठशे परप्रांतीय मजूर मूळगावी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 9:16 PM
लॉकडाऊन असल्याने परप्रांतीय मजूर, भाविक, पर्यटक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात अडकले होते.
ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्ते व संघटना यांच्या माध्यमातून खासगी बसचे नियोजनफिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, तसेच सॅनिटायझरसह सुरक्षा साधनांचा वापर