पिंपरी : फेसबुक या सोशल माध्यमावर शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे मिळवून देण्याची जाहिरात टाकली. त्या माध्यमातून बँक खात्यावर पैसे घेत फसवणूक केली. ही घटना १४ डिसेंबर २०२४ ते गुरुवार (दि. २१) या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार, जीतु शर्मा, आर्यन खान, मुतु कुमार, डेव्हिण पेटीयर, सुझान बेलामी, अमित शहा, दिया वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी फेसबुक या सामाजिक माध्यमावर शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे मिळवून देतो अशी जाहिरात टाकली. जाहीरातीच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फिर्यादी यांना घेतले. त्या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक अकाउंटवर ३८ लाख ६ हजार रुपये घेतले. त्याचा त्यांना परतावा न देता त्यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.