पिंपरी : चार किलो ड्रायफ्रूट फक्त ३९९ रुपयात देण्याची ऑफर सोशल मीडियावर दिली. त्या माध्यमातून ड्रायफ्रूट खरेदी करणाऱ्या एका ग्राहकाच्या क्रेडिट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर एक लाख ७९ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली. खेड तालुक्यातील महाळुंगे येथे ३० मार्च रोजी हा प्रकार घडला.
चंद्रकांत उत्तम गुंड (४१, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. समस्त टेक्नॉलॉजीस पी आर नावाच्या सोशल मीडियावरील खातेधारकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी समस्त टेक्नॉलॉजीस पीआर नावाच्या फेसबुक या सोशल मीडियावर पेज तयार केले. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते, मनुके असे प्रत्येकी एक किलो एकूण चार किलो ड्रायफ्रूट फक्त ३९९ रुपयात मिळेल, अशी कॉम्बो ऑफर दिली. फिर्यादी चंद्रकांत गुंड यांनी ती जाहिरात पाहून ड्रायफूट खरेदी करण्यासाठी पेजवर क्लिक केले. त्यानंतर पेमेंटच्या बहाण्याने गुंड यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत संशयितांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख ७९ हजार ४०० रुपये वळते करून घेत फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते तपास करीत आहेत.