पिंपरी : मंजूर विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत असणाऱ्या विसावा चौक ते देहू आळंदी रस्त्यावरील ५ आरसीसी आणि ३५ वीट अशी ४० बांधकामे भुईसपाट करण्यात आली, तसेच चिखली, कुदळवाडी परिसरातीलही बांधकामावर हातोडा पाडण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत आणि आरक्षणातील बांधकामे हटविण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे - पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर यांची बैठक झाली होती. त्यात कारवाईचे आदेश दिले होते. प्रभाग क्रमांक २ मधील विसावा चौक ते देहू आळंदी रस्ता या ३० मीटर रुंद रस्त्यावरील बांधकामे हटविण्यास सुरुवात झाली आहे.
असा होता बंदोबस्त
पथकात सहायक आयुक्त तानाजी नरळे, राजेश आगळे, सीताराम बहुरे, कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते, स्थापत्य सुनीलदत्त नरोटे, उपअभियंता मनोज बोरसे, राजेश जगताप, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य, किरण सगर, अशोक मोरे, अश्रू वाकोडेमी, सुमित जाधव, ऐश्वर्या मासाळ, निकिता फडतरे, स्मिता गव्हाणे यांचा कारवाईत समावेश होता. त्याचबरोबर महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, पोलिस कर्मचारी यांचा फौजफाटा तैनात होता.
शहराच्या विविध भागांत अतिक्रमण कारवाई केली जात आहे. महापालिकेची परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड, बांधकाम करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. चिखली, कुदळवाडी परिसरातील एकूण ४६ हजार ५०० चौरस फूट आरसीसी बांधकामे व औद्योगिक पत्राशेडवर ३ पोकलेन, १ जेसीबीच्या माध्यमातून कारवाई केली. मंजूर विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यासाठी कारवाई या पुढेही सुरू राहील, अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू राहणार आहे. - तानाजी नरळे, सहायक आयुक्त