पिंपरी : तुमचे एटीएम कार्ड खराब झाले आहे, असे सांगून एका पोलीस कॉन्स्टेबलला एका भामट्याने तब्बल ४० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. हा प्रकार थेरगाव, डांगे चौक येथे घडला. याबाबत कॉन्स्टेबल दिनकर एकनाथ भोसले (वय ५५, रा. कावेरी नगर, पोलीस वसाहत, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर भोसले यांनी हरिश्चंद्र यादव (रा. गिलनगर, मानवेल पाडा, विरार रोड) या आरोपीसह अन्य एका अज्ञात आरोपीविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी भोसले चतु:शृंगी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत.जुलै २०१७ मध्ये ते वाकड डांगे चौकातील एसबीआय एटीएम केंद्रात पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी गेले होते. पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी वेळ लागत होता. त्या वेळी एका अज्ञात इसमाने त्यांना एटीएम कार्ड खराब झाल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. त्यांच्या एटीएमचा वापर करून ते ४० हजार रुपये परस्पर हरिश्चंद्र यादव याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले. याबाबत भोसले यांनी सायबर क्राइम विभागार्फत चौकशी केली असता हरिश्चंद्र यादव आणि अन्य एका अज्ञात इसमाने त्यांची फसवणूक केली.
पोलीस कर्मचा-याला ४० हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:05 AM