पिंपरी : कचरा पश्नाबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ठेकेदार अधिकारी आणि पदाधिकारी यांची बैठक घेत प्रश्न जाणून घेतले. येत्या दोन दिवसांत कचरा प्रश्न न सोडविल्यास ठेकेदारांवर कारवाई करावी अशी सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या गटनेत्यांनी मागणी केली. त्यानुसार प्रशासनाने कचरा कोंडी फोडण्यासाठी ४८ तासांची मुदत ठेकेदारांनी दिली आहे. कचऱ्याच्या प्रश्नाबाबत आयुक्त दालनात बैठक झाली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, माजी उपमहापौर राजू मिसाळ, आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. अनिल रॉय आदी उपस्थित होते. यावेळी ठेकेदार कंपन्याचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी गटनेत्यांनी कचरा प्रश्नावरून अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरले. कचरा उचलला गेला नाहीतर महापालिकेत कचरा आणून टाकू असा इशारा विरोधकानी दिला. तसेच दोन दिवसांची मुदत दिली. याविषयी स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, कचरा प्रश्नाबाबत नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार आयुक्तांना बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार बैठक झाली. संबंधित ठेकेदारांना दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्यांनी कामात सुधारणा न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशाही सूचना प्रशासनास केल्या आहेत.सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, कचरा संकलनाचे काम समाधानकारक नाही. येत्या दोन दिवसात कचऱ्याबाबत असणाऱ्या तक्रारी कमी व्हायला हव्यात. घडी जर सुरूळीत झाली नाही तर संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी. अशा महापालिका आयुक्तांना सुचना केली आहे. त्यामुळे ठेकेदारांनी कामात सुधारणा करावी शहराचे आरोग्य चांगले ठेवावे.
कचरा प्रश्न सोडविण्यासाठी ४८ तासांची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 5:36 PM