हणमंत पाटील पिंपरी : ग्रीन सिटीचा लौकीक असणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील ४८६ झाडे मेट्रो प्रकल्पासाठी काढण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्तांनी त्यासाठी थेट परवानगी दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रकल्पासाठी काढण्यात येणा-या या झाडांमुळे शहराचे पर्यावरण धोक्यात येणार आहे.महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनतर्फे स्वारगेट ते पिंपरी या पहिल्या मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड हद्दीतील हॅरीश ब्रीज ते पिंपरी महापालिका अशा ७ किलोमीटरचा पहिल्या टप्प्यात काम सुरू आहे. त्यामध्ये ६ मेट्रो स्थानके येणार आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाने या महामार्गाच्या दुभाजकावर अनेक वर्षांपासून जोपासलेली झाडे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गाला अडथळा ठरत आहेत. त्यामध्ये पिंपळ, उंबर, चंदन, कडुनिंब, खाया व मोहगणी या देशी वृक्षांचाही समावेश आहे. महापालिकेचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. त्यामध्येही शहरात प्रदुषण वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचा इशारा देण्यात आला आहे.उद्यान विभागाचे तीनदा जीवदानयाच महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणावेळी उद्यान विभागाने ही झाडे वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर बीआरटी प्रकल्पावेळी अशा पध्दतीने तीन वेळा ही झाडे वाचविण्यात उद्यान विभागाला यश आले. त्याप्रमाणे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात काही बदल केल्यास१५८ ऐवजी ३६ झाडे बाधितहोतील. १२२ झाडे वाचविण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाने दिला होता. मात्र, महामेट्रोने हा प्रस्ताव धुडकावित १५८ तातडीने हलविण्याची मान्यता घेतली आहे. त्यासंबंधिचा पत्रव्यवहार ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.‘उद्यान’चा प्रस्ताव धुडकावलामहापालिकेच्या उद्यान विभागाने दुभाजकांच्या सुशोभिकरणासाठी झाडे, वेली व फुलांच्या विविध प्रजातींचे संवर्धन केले आहे. त्यामुळे या झाडांची वाट लावण्याऐवजी मेट्रोचा मार्गात बदल करण्याची सूचना आणि भरपाई म्हणून १९ लाख ६८ हजार रुपये देण्याविषयीचा प्रस्ताव उद्यान विभागाने महामेट्रोला दिला होता. मात्र, ही मागणी धुडकावित महामेट्रोने थेट आयुक्तांकडून झाडांचा अडथळा दूर करण्यासाठीची परवानगी मिळविली आहे.अशी आहे आयुक्तांनी दिलेली परवानगीमहापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या परवानगीनुसार हॅरीश ब्रीज ते पिंपरीच्या ग्रेडसेप्रेटरपर्यंत झाडांचा विस्तार कमी करणे, झाडांचे पुर्नरोपण करणे, झाडे पूर्ण काढून टाकणे अशी एकूण ४८६, तसेच दुभाजकांवरील सुशोभीकरणासाठी लावलेली फुलांची झाडे व वेल असा सुमारे ४ हजार ५६७ चौरस मीटरचा भाग पूर्ण काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ही परवानगी देताना सुशोभीकरणाचे पुर्नस्थापन करणे, वृक्ष काढताना वाहतूक, विद्युत तारा व इतर मालमत्तांचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेण्याची अट आहे. काढलेल्या वृक्षाऐवजी प्रत्येकी १० वृक्ष लावण्यात यावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
‘मेट्रो’ प्रकल्पासाठी ४८६ झाडांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 7:23 AM