पिंपरी : बांगलादेशी घुसखोरांवर पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. यात पाच पाच घुसखोर बांगलादेशींना अटक केली. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला मिळून आला. भोसरी येथील शांतीनगरमध्ये शनिवारी (दि. २५) सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई केली. पिंपरी-चिंचवड शहरात बांगलादेशी घुसखोरांवर यापूर्वीही कारवाई झाली होती. त्यानंतरही शहरात पुन्हा बांगलादेशी घुसखोर मिळून आल्याने खळबळ उडाली.
शामीम नुरोल राणा (२६, रा. जमलपूर, जि. ढाका), राज उर्फ सम्राट सधन अधिकारी (२७, रा. लक्ष्मीपूर, राजेर, जि. मदारीपूर), जलील नुरू शेख ऊर्फ जलील नुरमोहम्मद गोलदार (३८, रा. चर आबूपूर, हिजला, जि. बोरीसाल), वसीम अजिज उलहक मंडल उर्फ वसीम अजिज उलहक हिरा (२६), आझाद शमशुल शेख उर्फ मो. अबुल कलाम शमशुद्दीन फकीर (३२, दोघेही रा. फुलबरिया, जि. मयमेनसिंग), अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. त्यांना पिंपरीतील नेहरुनगर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत (दि. २९) पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्यासह त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या इतर संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार सुयोग लांडे यांनी याप्रकरणी रविवारी (दि. २६) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी येथील शांतीनगरमध्ये काही बांगलादेशी घुसखोर ओळख लपवून वास्तव्य करत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी शाखेला मिळाली. त्यानुसार दहशत वाद विरोधी शाखा आणि भोसरी पोलिसांनी कारवाई केली. यात पाच संशयितांना अटक केली. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला व पासपोर्ट मिळून आले. त्यांनी या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे भासवून भारतात वास्तव्य केले. त्यांनी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय किंवा भारतामध्ये राहण्याकरिता लागणाऱ्या वैध व्हिसाशिवाय भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला.
घुसखोरांमधील काहींनी पश्चिम बंगालमध्ये बनावट कागदपत्रे तयार केली. एका बांगलादेशीने पुण्यात बनावट कागदपत्रे तयार केली. तर एक घुसखोर इतर राज्यात काही वर्ष राहिल्यानंतर भोसरी येथे वास्तव्यासाठी आला होता. अटक केलेले पाचही घुसखोर हे भोसरी येथील ओम क्रिएटिव्ह टेलर्स या कंपनीमध्ये काम करीत होते. त्यांनी भारतीय बनावट कागदपत्रांचा वापर करून सीम कार्ड मिळवले. तसेच ११ हजार रुपये किमतीचा मोबाइल घेतल्याचे पोलिस तपासातून समोर आले.