पिंपरी : पाचशे वर्ष आमच्या छातीवर जो कलंक होता तो मिटणार आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे लोकार्पण होणार आहे. यादिवशी देशाला एक नवीन ओळख मिळणार आहे. आपले स्वप्न रामराज्य होणे हे आहे. जस छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेच राज्य होत. तसच रामराज्य तयार होईल. त्यातून वाचाळविरांनाही प्रभू राम सदबुद्धी देतील असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान ‘अटल विनामुल्य महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर करण्यात आले आहे. या शिबिराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, काही लोकांना देशात एवढा पवित्र कार्यक्रम होतोय याचही दुःख होतय. कालच एक वाचाळवीर काहीतरी बोलला. प्रभू राम नॉनव्हेज खात होते असं बेताल वक्तव्य करून नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम केले जाते. करोडो लोकांचं श्रद्धास्थान आणि त्याबद्दल बेताल बोलतात. अशा पवित्र काळात हे जनहिताच कार्य आम्ही पुढे नेत राहू असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.