पिंपरी : इटालियन महिलेचा मेल हॅक करून तळेगाव एमआयडीसीतील कंपनीतून वेगवेगळ्या खात्यावर पैसे भरण्यास सांगून तब्बल ५४ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुशील भीमराव गडलिंग (वय ४६, रा. निगडी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटालियन महिला ॲनालिसा फेरी यांची तळेगाव एमआयडीसीमध्ये कंपनी आहे. फेरी यांचा मेलआयडी हॅक करून कंपनीचे कामकाज पाहणाऱ्यांना मेल केला. त्यामध्ये गोलप बुबु इंटरप्रायजेस, मोहम्मद जुवेर इंटरप्रायजेस, सुरजसिंग इंटरप्रायजेस या अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. संबंधितांनी ५४ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र, मेलवरून पुन्हा पैशाची मागणी झाल्याने कंपनीचे कामकाज पाहणाऱ्यांनी ॲनालिसा फेरी यांना फोन केला. तेंव्हा आपण कोणतेही पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर फिर्यादींनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.