पिंपरी : ताथवडे येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाच्या सेवा रस्त्याच्या कडेने महामार्गाच्या दोन्ही बाजूने पाइपलाइन टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. या कामांतर्गत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची परवानगी घेण्यासाठी ६० लाख रुपये परवाना शुल्क भरण्यात येणार आहे.ताथवडे गावच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ताथवडेगावात पाणी पुरवठा वितरणनलिका टाकण्याचे काम जेएनएनयूआरएमअंतर्गत प्रगतिपथावर आहे. या कामांतर्गत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीतील पावणेतीन किलोमीटर दरम्यान सेवा रस्त्याच्या कडेने पुनावळे हद्दीपासून ताथवडे येथील महामार्गाच्या दोन्ही बाजूने जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम सुरू असताना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी हरकत घेतली. परवानगी घेऊनच काम सुरू करण्याबाबत कळविले. पुनावळे हद्दीपासून जलवाहिनीची लांबी एका बाजूने दोन हजार ८०० मीटर एवढी आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजू विचारात घेता एकूण लांबी पाच हजार ६०० मीटर एवढी होत आहे.१एवढ्या लांबीची जलवाहिनी टाकण्यासाठी व ताथवडे अंडरपासजवळ हायवे क्रॉसिंगसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे परवानगीसाठी पाणीपुरवठा विभागामार्फत पाठपुरावा सुरू होता.२भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी २५ जून २०१७ ला पत्राद्वारे १ कोटी १७ लाख रुपये परवाना शुल्क भरण्याबाबत कळविले होते.३पाणीपुरवठा विभागाने पुन्हा मोजणी केल्यानंतर हे परवाना शुल्क ६० लाख रुपये होत असल्याबाबत २५ सप्टेंबरला पत्राद्वारे महामार्ग प्राधिकरणाला कळविले.
प्राधिकरणाला देणार ६० लाखांचे शुल्क, महामार्गालगत जलवाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 6:03 AM