पिंपरी : महापालिका प्रशासनाने स्थायी समितीस सादर केलेला २०१९-२० वर्षासाठीचा अर्थसंकल्प विनाचर्चा मंजूर करण्यात आला. एकूण ६ हजार १८३ कोटींचा अर्थसंकल्पात ४२ उपसूचनांद्वारे २६७ कोटींची वाढ सुचविली आहे. स्थायी समितीने केलेल्या वाढीसह सुमारे ६ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्पास अवघ्या पाच मिनिटांत मंजुरी दिली.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील सभेत स्थायी समिती सभापतींना सुमारे ६ हजार १८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर चर्चा आणि अभ्यासासाठी स्थायी समितीने सभा २८ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब केली होती. महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात स्थायीची सभा झाली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या ४६२० कोटींच्या मूळ अर्थसंकल्पात ३० कोटी २४ लाख रुपये शिल्लक दाखविले होते. नवीन कोणताही प्रकल्प न राबविता स्मार्ट सुविधांवर आयुक्तांनी भर दिला होता. तर काही कामे मागील पानांवरून पुढील पानावर आली होती. तसेच उपसूचना स्वीकारणार की नाही? याबाबत साशंकता होती. मात्र, उपसूचना स्वीकरण्याचे धोरण सत्ताधाऱ्यांनी स्वीकारले. त्यानंतर उपसूचनांची जमवाजमव सुरू होती. आजच्या सभेत अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, सदस्यांनी आयुक्तांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले. अर्थसंकल्प चांगला आहे, असे गौरवोद्गार सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या सदस्यांनी काढले.
कोणतीही चर्चा न करता स्थायी समितीने ४२ उपसूचनांचा स्वीकार केला. या उपसूचना २६७ कोटींच्या होत्या. उपसूचनांसह ६ हजार ४५० कोटींच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे चर्चेला ठेवण्यात येणार आहे.शेवटच्या सभेचा रात्रीस खेळ चाले : ऐनवेळी १५० विषयांचा पाऊसपिंपरी : महापालिका स्थायी समिती विद्यमान समितीची मुदत आजअखेर संपली. त्यामुळे शेवटच्या दिवशी गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत सभेचा खेळ सुरू होता. स्थायी समितीच्या या सभेत विषयपत्रिकेवरील ४६ आणि ऐनवेळेसचे १५० अशा सुमारे दोनशे विषयांना मंजुरी दिली. सुमारे पावणे चारशे कोटींच्या विषयांना शेवटच्या सभेत मंजुरी देण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यमान स्थायी समितीतील दोन वर्षे सदस्यांची मदत फेब्रुवारी अखेर पूर्ण झाली.तर नवीन सदस्यांचीही निवड झाली आहे. त्यामुळे या वर्षीच्या समितीच्या शेवटच्या सभेत किती विषय मंजूर होणार याबाबत उत्सुकता होती. स्थायी समितीचा शेवटचा दिवस कत्तल की रात असतो. सभेची वेळ दुपारी तीनची होती. मात्र, ही सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ही सभा रात्री आठला सुरू झाली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. विषयांची जुळवाजुळव करण्याचे काम सायंकाळी सुरू होते. समिती सदस्य आणि प्रशासनाचा रात्रीस खेळ सुरू होता.सल्लागार, रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी कोटींची उड्डाणेविषय पत्रिकेवर ४६ विषय होते. त्यापैकी काही विषय तहकूब करून फेटाळण्यात आले. अवलोकनाचे ऐंशी लाखांचे १५ विषय होते. एकूण २० कोटी ४३ लाखांचे मूळ विषय मंजूर करण्यात आले. त्यानंतर ऐनवेळेसचे सुमारे दीडशे विषय सभेसमोर आणण्यात आले. नियमित विषय आणि ऐनवेळेसच्या विषयांसह सुमारे पावणे चारशे कोटींच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये सल्लागार नेमणे, रस्त्यांची कामे, उद्यानांची कामे, प्रशासकीय मान्यता, डांबरीकरण, स्थापत्य विभागाची कामे असे विविध विषय मंजूर करण्यात आले आहेत.