पिंपरी : मोबाईलवरील एका जाहीरातीतील डेटिंग संकेतस्थळावर क्लिक करणे कर्मचाऱ्याला महागात पडले. जाहिरातीतील आमिषापोटी त्याला तब्बल ६५ लाख रुपये गमवावे लागले. ही घटना १८ मे ते २० सप्टेंबर २०१९ या कालावधीत राजे शिवाजीनगर चिखली येथी घडली आहे.चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत विश्वनाथ ढाळे (वय ४०, रा. मोरया पार्क, राजे शिवाजीनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. ढाळे हे एका कंपनीत काम करीत असून १८ मे २०१९ रोजी त्यांनी इंटरनेटवर गूगल सर्चच्या माध्यमातून डेटिंग साईट बघितल्या. त्यावर एका सुंदर तरुणीबरोबर डेटवर जाण्याबद्दल जाहिरात होती. जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर ढाळे यांनी संपर्क केला असता त्यांना प्रथम रजिस्ट्रेशन करायला सांगितले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर डेटिंगची पुढील सेवा मिळेल, असेही सांगिण्यात आले. त्यानुसार, रजिस्ट्रेशन करण्यासाठी ढाळे यांनी इंडियन बँकेच्या खात्यावर १२०० रुपये भरले. ढाळे यांनी जाहिरातीत मागितलेली सर्व व्यक्तिगत माहिती फॉर्ममध्ये भरली. फॉर्म सबमिट करताच ढाळे यांना संबंधित साईटवरून फोन यायला लागले. डेटवर जाण्यासाठी आधी काही पैसे जमा करण्याची आवश्यकता असून, हे पैसे डेट झाल्यानंतर परत करण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे ढाळे यांनी काही रक्कम इंडियन बँकेच्या अकांऊंटवर भरली. या सर्व प्रकाराला एक आठवडा उलटून गेला तरी आणखी पैशांची मागणी होऊ लागली. त्यामुळे ढाळे यांना संशय आला. आपले सर्व पैसे परत हवे असून अकाऊंट डिलीट करायचे आहे, असे नमुद करताच संपर्क करणाºया मुलीने अकाऊंट डिलीट करण्यासाठी आणखी पैसे भरा, असे सांगितले. मात्र, ढाळे यांनी नकार दिला. त्यामुळे डेटींग साईटने प्रोफाईल क्लोजर, होल्डिंग चार्ज, अकाउंट व्हेरिफिकेशन, प्रोफाईल मॅचिंग, कमिशन अशा कारणांसाठी आणखी पैसे भरण्यास भाग पाडले. तब्बल ६५ लाख रुपये उकळले. सायबर सेलने तपास करून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
डेटिंग साईटच्या नादात कर्मचाऱ्याला ६५ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 8:27 PM
एका सुंदर तरुणीबरोबर डेटवर जाण्याबद्दल होती जाहिरात...
ठळक मुद्दे जाहिरातीतील आमिषापोटी त्याला गमवावे लागले तब्बल ६५ लाख रुपये