चिंचवड - चिंचवड गावातून बिजलीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एबीसी हौसिंग सोसायटी आवारात असणाºया ७० अशोका जातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. इतक्या मोठया प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याने शहरातील पर्यावरण प्रेमी व नागरिक संताप व्यक्त करत आहेत.एकीकडे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शहरात विविध उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे अशा प्रकारे झाडांची खुले आम कत्तल होत आहे. ही बाब गंभीर आहे. येथील सोसायटी आवारात असणारी मोठी झाडे तोडण्यात आली आहेत. ही झाडे जास्त उंचीची झाल्याने त्याची छाटणी करणे गरजेचे होते. पावसाळ्यात ही झाडे वाºयाने वाकली जातात. मात्र येथील झाडांची बुंध्यातून छाटण्यात आल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.सोसायटी आवारातील ही झाडे पादचाºयांना त्रासदायक ठरत असल्याने कापण्यात आल्याचे येथील वृक्षतोड कर्मचारी सांगत आहेत. मात्र ही छाटणी करण्यासाठी महापालिक प्रशासनाची परवानगी घेतली का? याबाबत ते मूग गिळून गप्प बसत आहेत. यामुळे येथील वृक्षतोड कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.धोकादायक झाडांची छाटणी अथवा संपूर्ण झाड तोडण्यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, चिंचवडमधील हा प्रकार पाहता येथील वृक्षतोड ही गंभीर बाब आहे. संबंधित झाडांच्या छाटणीबाबत येथील रहिवाशांना विचारले असता आम्हाला याबाबत माहीत नसल्याची उत्तरे स्थानिक नागरिक देत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी शहरातील पर्यवरणप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे.शहरात सर्रास वृक्षतोडशहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अनेक उपाययोजना महापालिकेकडून करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यांचे रुंदीकरण करणे. अनेक रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. अजूनही अनेक रस्त्यांचे रुंदीकरण सुरू असून, त्यासाठी सर्रास वृक्षतोड करण्यात येत आहे. वृक्षतोडीबाबत अनेक संस्था आणि संघटनांकडून आंदोलन आणि निषेध करण्यात येतो. तरी महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करून विकासकामांच्या नावाखाली वृक्षतोड करीत आहे. कमीत कमी झाडांची कत्तल करण्यात येईल, असे विकासकामांवेळी महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र तसे होताना दिसत नाही. झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जात आहेत.पुनर्रोपणाबाबत साशंकताविकासकामांसाठी तोडण्यात आलेल्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. असे असले तरी कत्तल करण्यात आलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. पुनर्रोपण नेमके कोठे, कधी आणि किती झाडांचे करण्यात आले याबाबत महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी आणि नियमित माहिती उपलब्ध होत नाही. किती झाडांची कत्तल झाली, त्यापैकी किती झाडांचे पुनर्रोपण झाले, याबाबत संदिग्धता दिसून येते. पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांपैकी किती झाडे तग धरून आहेत, त्यांच्या संवर्धनाचे काय नियोजन आहे, आदी प्रश्नांची उकल महापालिकेकडून होत नाही.वृक्षरोपणाबाबतही उदासीनतामहापालिकेच्या वतीने दरवर्षी वृक्षरोपण मोहीम राबविण्यात येते. महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांवर आणि विविध जागांवर वृक्षरोपण करण्यात येते. मात्र रोपण केल्यानंतर संबंधित झाडांच्या संवर्धनाबाबत महापालिका प्रशासना उदासीन असल्याचे दिसून येते. रोपण करण्यात आलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली याचीही निश्चित आकडेवारी दरवर्षी उपलब्ध करून देण्यात येत नाही. दरवर्षी त्याच जागांवर पुन्हा वृक्षरोपण करण्यात येते. त्यामुळे या उपक्रमाबाबतही शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्षशहरात महापालिकेसह विविध सामाजिक संघटना आणि संस्थांकडून वृक्षारोपण करण्यात येत आहे. मात्र, यातील बहुतांश झाडे तग धरत नाहीत. वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील झाडांच्या संख्येत वाढ होताना दिसत नाही. यासाठी वृक्षरोपणासह त्याच्या संवर्धनाबाबतही व्यापक स्वरुपात जनजागृती होणे आवश्यक आहे. महापालिका आणि शैक्षणिक संस्था यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महापालिका हद्दीतील प्रत्येक झाडाची देखभाल होईल अशी यंत्रणा कार्यान्वित होणे अपेक्षीत आहे.कारवाईकडे दुर्लक्षवृक्षतोड करणाºया व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे. मात्र तक्रार करूनही या विभागाकडून कार्यतत्परता दाखविण्यात येत नाही. त्यामुळे वृक्षतोड करणाºया व्यक्तींचे फावते. वृक्षतोडीस यातून चालना मिळते. याला आळा घालून वृक्षतोड करणाºया दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.चिंचवड येथील सोसायटीतील नागरिकांनी अशोकाची झाडे खूप वाढल्याने वाºयाने ती रस्त्यावर पडत आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत, अशी तक्रार केली होती. तसेच नगरसेवकांनीही याबाबत मागणी केली होती. त्यानुसार उद्यान विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली़ त्या वेळी नागरिकांची तक्रार खरी आहे हे लक्षात आले. त्यानंतर अडथळा ठरणाºया झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत.-पी. एम . गायकवाड, उद्यान विभाग