चाकण / काळुस : खासगी सामाईक शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये सभासद होत नसल्याचा राग मनात धरून काळूस ( ता.खेड ) येथील ७० जेष्ठ नागरिकाचे अपहरण केल्याची घटना घडली असून जेष्ठ नागरिकाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून काळूस येथील एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार नामदेव जाधव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना ११ मे रोजी सकाळी ८ वाजून १ मिनिटांनी काळूस गावच्या हद्दीत घडली. सोनबा गोविंद खैरे ( वय ७० ) यांचे अपहरण केल्याप्रकरणी त्यांचा मुलगा काळुराम सोनबा खैरे ( वय ३६, रा. काळूस ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संजय मारुती खैरे ( रा. काळुस, ता.खेड, जि. पुणे ) याचेवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७४/२०१८, भादंवि कलम ३६४ नुसार आज ( दि. १८ ) अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, ११ तारखेला सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी सोनबा गोविंद खैरे यांना आरोपी संजय मारुती खैरे याने काळूस गावच्या खासगी सामाईक शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये त्याच्या बरोबर सभासद होत नसल्याचा राग मनात धरून स्कॉर्पिओ गाडी क्रमांक ( एम एच १४ - डीए - ५३५३ ) यामध्ये बसवून पळवून नेले आहे. चाकण पोलीस ठाण्यात या अगोदर सोनबा खैरे हे बेपत्ता झाल्याची खबरही देण्यात आलेली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हरगुडे पुढील तपास करीत आहेत
७० वर्षाच्या जेष्ठ नागरिकास पळविले, एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 9:04 PM