पिंपरी : आठही मुलीच झाल्याने पती छळ करीत होता. तसेच त्याने दुसरे लग्न करण्याची तयारीही केली. यामुळे पत्नीने पतीवर विषप्रयोगाचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या खुनासाठी दोन लाखांची सुपारीही दिली. सराईत गुन्हेगारांनी खुनी हल्ला केल्याने पती गंभीर जखमी झाला. आठ तासांत निगडी पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकत गुन्हा उघडकीस आणला.
शिवम दुबे ऊर्फ दुब्या आणि अमन पुजारी (दोघेही रा. पंचतारानगर, आकुर्डी) आणि जखमीची पत्नी अशी गुन्हा दाखल करून अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत जखमीच्या मुलीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिलेला आठ मुली झाल्या. या कारणावरून तिचा पत छळ करीत होता. तसेच त्याने दुसरे लग्न करण्याची तयारीही केली होती. यामुळे संतापलेल्या पत्नीने त्याचा काटा काढण्याचे ठरविले. सुरवातीला तिने आपल्या पतीवर विषप्रयोग करण्याचे ठरविले. मात्र पती सावध असल्याने वेळोवेळी तिचा हा प्रयोग फसला.
दरम्यान, तिने परिसरातील सराईत गुन्हेगार अमन पुजारी याला दोन लाख रुपयांची पतीच्या खुनाची सुपारी दिली. या कामासाठी त्याने त्याचा मित्र शिवम दुबे याला सोबत घेतले. सुपारी मिळालेल्या पैशातून त्यांनी तलवारीही खरेदी केल्या. ७ डिसेंबर रोजी रात्री पती दारू पिऊन झोपल्याचे पत्नीने शिवम आणि अमन यांना सांगितले. त्यानंतर घरात घुसून दोघांनी पतीवर तलवारीने सपासप वार केले. पती मृत झाल्याचे समजून ते तेथून निघून गेले.
याप्रकरणी गुन्हा दाखल करत निगडी पोलिसांनी तपासाला सुरवात केली. परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली असता पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी संशयित अमन याला ओळखले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार दुबे याचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही अटक केली. या दोघांकडे चौकशी केली असता जखमी व्यक्तीच्या पत्नीनेच सुपारी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी जखमीच्या पत्नीला अटक केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस उपायुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.