ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 20 - पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाल्याने क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत झालेला बदल लक्षात घेऊन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सहा क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना केली. परंतु, लोकसंख्येच्या तुलनेत क्षेत्रीय कार्यालयांची संख्या अपुरी असल्याचे गुरूवारी (दि. २०) झालेल्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. त्यामुळे सत्तधारी भाजपने एकूण आठ क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यास सभेत मंजुरी दिली. यापूर्वी महापालिकेची सहा क्षेत्रीय कार्यालये होती. आता त्यात दोनची भर पडली असून, एकूण आठ क्षेत्रीय कार्यालये असणार आहेत. या आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी चार निवडणूक प्रभागांचे कामकाज चालणार आहे.
महापालिका प्रशासकीय कामकाजासाठी १९९७ मध्ये चार प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन प्रभाग कार्यालयांची निर्मिती केली. या सहा प्रभागांना क्षेत्रीय कार्यालय संबोधण्याचा २०१२ मध्ये सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून महापालिका मुख्यालय आणि सहा क्षेत्रीय कार्यालयांतून प्रशासनाचा गाडा चालविला जात होता.
मात्र, फेब्रुवारी २०१७ मध्ये चार सदस्यीय पद्धतीने महापालिका निवडणूक झाली. त्यानुसार ३२ निवडणूक प्रभाग झाले आहेत. ही प्रभाग रचना होत असताना पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये, तसेच नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे यासाठी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना केली. त्याबाबतचा प्रस्ताव गुरूवरी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
त्यावर झालेल्या चर्चेत सत्ताधारी भाजपच्या वतीने लोकसंख्येच्या तुलनेत कायद्यानुसार किती क्षेत्रीय कार्यालयांची आवश्यकता आहे?, असा प्रश्न प्रशासनाला विचारला. त्यावर खुलासा करताना लोकसंख्येच्या तुलनेत एकूण १० क्षेत्रीय कार्यालये असणे गरजेचे असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. महापालिकेकडे असलेले अपुरे मनुष्यबळ पाहता सत्ताधारी भाजपने एकूण आठ क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्याची उपसूचना सभेत मांडली. त्यास महापौर नितीन काळजे यांनी मंजुरी दिली.
असे असतील आठ क्षेत्रीय कार्यालये-
“अ” क्षेत्रीय कार्यालय - निवडणूक प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९ (आनंदनगर, भाटनगर).
“ब” क्षेत्रीय कार्यालय – निवडणूक प्रभाग क्रमांक १६ (रावेत), प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर), प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड) आणि प्रभाग क्रमांक २२ (काळेवाडी).
“क” क्षेत्रीय कार्यालय – निवडणूक प्रभाग क्रमांक २ (बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक ६ (धावडेवस्ती), प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणीनगर) आणि प्रभाग क्रमांक ९ (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा).
“ड” क्षेत्रीय कार्यालय – निवडणूक प्रभाग क्रमांक २५ (वाकड), प्रभाग क्रमांक २६ (पिंपळेनिलख), प्रभाग क्रमांक २८ (पिंपळेसौदागर) आणि प्रभाग क्रमांक २९ (पिंपळेगुरव).
“इ” क्षेत्रीय कार्यालय – निवडणूक प्रभाग क्रमांक ३ (चऱ्होली), प्रभाग क्रमांक ४ (दिघी), प्रभाग क्रमांक ५ (गवळीनगर) आणि प्रभाग क्रमांक ७ (भोसरी).
“फ” क्षेत्रीय कार्यालय – निवडणूक प्रभाग क्रमांक १ (चिखली), प्रभाग क्रमांक ११ (कृष्णानगर), प्रभाग क्रमांक १२ (तळवडे-रुपीनगर) आणि प्रभाग क्रमांक १३ (यमुनागनर, सेक्टर क्रमांक २२).
“ग” क्षेत्रीय कार्यालय – निवडणूक प्रभाग क्रमांक २१ (पिंपरीगाव), प्रभाग क्रमांक २३ (थेरगाव), प्रभाग क्रमांक २४ (गणेशनगर) आणि प्रभाग क्रमांक २७ (रहाटणी).
“ह” क्षेत्रीय कार्यालय – निवडणूक प्रभाग क्रमांक २० (संत तुकारामनगर-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३० (दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३१ (नवी सांगवी) आणि प्रभाग क्रमांक ३२ (सांगवी).