पिंपरी : कंपनीचे व्हिडीओ लाईक आणि शेअर केल्यास पैसे मिळतील, असे सांगितले. काही दिवसांनी ८७ लाखांची फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
युनायटेड ह्युमन रिसर्च डिपार्टमेंटचा एच.आर. (बेला पूर्णा) याने फसवणूक केली असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली. काही दिवस व्हिडीओ शेअर केल्याने पैसे दिले. विश्वास संपादन करत विविध प्रकारचे टास्क दिले. टास्कची पूर्तता करताना काहीतरी चूक झाली. चूक दुरुस्त करण्यासाठी क्रेडिट स्कोअर आणि खाते ॲक्टिव करण्यासाठी पैसे भरण्यास सांगितले.
संपूर्ण पैसे भरले नाही तर याआधीचे पैसेही बुडतील अशी भीती दाखवली. हा धाक दाखवून बँक खाते व यु.पी.आय आयडीमध्ये ८७ लाख रुपये ऑनलाईन भरायला भाग पाडले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादीसोबत संपर्क बंद करुन पैसे परत न देता फसवणूक केली. पुढील तपास पोलिस करत आहे.