पिंपरी चिंचवड : महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर त्याठिकाणी नऊ नगरसेवकांचा समावेश असलेल्या शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपकडून सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्विनी चिंचवडे यांची आज समितीत निवड केली. महापौर नितीन काळजे यांनी शिक्षण समितीत निवड झाल्याचे जाहीर केले. स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित असलेल्या शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली. त्यामुळे सर्व शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिला होता. राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे महापालिका सभागृह अस्तित्वात असेपर्यंत म्हणजेच फेब्रुवारी २०१७ पर्यंत शिक्षण मंडळ स्वतंत्र अस्तित्वात ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाल्यानंतर १३मार्च २०१७ ला महापौर निवडीनंतर नवीन सभागृह अस्तित्वात आले. बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये त्याच वेळी शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले होते. आयुक्तांनी शिक्षण मंडळ बरखास्त झाल्याचे आदेश काढले नव्हते. शाळा सुरू होण्याच्या कालखंडात म्हणजेच २ जून २०१७ रोजी आयुक्तांनी शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेश काढले. शिक्षण मंडळाला प्रदान करण्यात आलेले सर्व अधिकार संपुष्टात आणले गेले.त्यानंतर शिक्षण मंडळाच्या जागी नव्याने महापालिकेच्या कायद्यानुसार शिक्षण समितीची स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये संख्याबळानुसार नगरसेवकांना संधी देण्यात आली. या समितीवर मंडळाप्रमाणे १५ सदस्यसंख्या घटून विविध विषय समितीप्रमाणे ९ नगरसेवकांची ही समिती आहे. त्यानुसार भाजपचे ७७ संख्याबळानुसार त्यांचे सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे हे पाच नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे तीन नगरसेवक आणि शिवसेनेच्या ९ संख्याबळानुसार अश्विनी चिंचवडे यांची समितीत निवड करण्यात आली आहे. महापौर नितीन काळजे यांनी या नगरसेवकांची समितीत निवड झाल्याचे घोषित केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीत नऊ नगरसेवकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 3:25 PM
शिक्षण मंडळाच्या जागी नव्याने महापालिकेच्या कायद्यानुसार शिक्षण समितीची स्थापन करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे२ जून २०१७ रोजी आयुक्तांनी शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेशसमितीवर मंडळाप्रमाणे १५ सदस्यसंख्या घटून विविध विषय समितीप्रमाणे ९ नगरसेवकांची समिती