पिंपरी : घरातील साहित्य विक्रीबाबत ओएलएक्सवर पोस्ट करणे महागात पडले. ते साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाला तीन लाख ९२ हजार ८५६ रुपयांचा गंडा घातला. रहाटणी पिंपळे सौदागर येथे सोमवारी (दि. १४) हा प्रकार घडला. विनयकुमार ताराचंद सूद (वय ६५, रा. रहाटणी, पिंपळे सौदागर) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने त्यांच्या घरातील टीव्ही कॅबिनेट हे नऊ हजार ५०० रुपये किमतीला विकण्याबाबत ओएलएक्स साईटवर ऑनलाईन फोटो अपलोड केले होते. त्यानुसार अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी ऑनलाइन माध्यमातून संपर्क साधून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादीला क्यूआर कोड शेअर केला. त्यानंतर फिर्यादीच्या एचडीएफसी बँक खात्यातून ९२ हजार ३३१ रुपये आणि आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून तीन लाख ५२५ रुपये, असे एकूण तीन लाख ९२ हजार ८५६ रुपये ट्रान्सफर करून फिर्यादीची फसवणूक केली.