पिंपरी : विक्रीसाठी टेम्पोमधून वाहतूक होत असलेला ९१ लाख २० हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. तसेच टेम्पो चालकाला अटक केली. नाशिक-पुणे महामार्गावर वाकी खुर्द परिसरातील रोहकल फाटा येथे रविवारी (दि. १०) पहाटे पाचच्या सुमारास चाकण पोलिसांनी ही कारवाई केली.
गणेश विठ्ठल भाडळे (वय ३२, रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक -पुणे महामार्गावरून पुणे येथे विक्रीसाठी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चाकण पोलिसांनी वाकी खुर्द परिसरात नाशिक -पुणे महामार्गावरील रोहकल फाटा येथे सापळा रचून कारवाई केली. रोहकल फाटा येथे आरोपीचा टेम्पो आला असता पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली. टॅम्पोमध्ये आरएमडी पान मसाला व एम सुगंधी तंबाखु असलेला एकूण ९१ लाख २० हजार रुपये किमतीचा गुटख्याचा माल मिळून आला. गुटखा व टेम्पो असा एक कोटी एक लाख २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड तपास करीत आहे.
सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, निरीक्षक अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, विक्रम गाकयवाड, उपनिरीक्षक नीलेश चव्हाण, सहायक फौजदार सुरेश हिंगे, पोलीस कर्मचारी संदीप सोनवणे, भैरोबा यादव, हनुमंत कांबळे, निखील शेटे, चेतन गायकर, नितीन गुंजाळ, प्रदीप राळे, निखील वर्पे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.