पवनानगर : लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी फिरण्यासाठी आलेल्या खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला. वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस लोहगड किल्ल्याजवळ असलेल्या दुधिवरे खिंडीत ४० फूट खाली दरीत कोसळली. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले, तर इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी (४ डिसेंबर) १० वाजेच्या सुमारास घडली.
पेण येथील एका खासगी क्लासेसचे विद्यार्थी मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी रविवारी आले होते. यामध्ये ७२ विद्यार्थी चार शिक्षक होते, तर इतर कर्मचारी चार, असे एकूण ८० जण होते. पेण येथील विद्यार्थी सहलीसाठी लोहगड किल्ल्यावर आले होते. वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस लोहगड किल्ल्याजवळ असलेल्या दुधिवरे खिंडीत सुमारे ४० फूट खाली दरीत कोसळून बसला मोठा आपघात झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असल्याचे लोणावळा ग्रामीणचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक नीलेश माने यांनी सांगितले.
जखमींना लोणावळा, सोमाटणे येथील खासगी रुग्णालय व काले काॅलनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींना लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेर काढले.