पिंपरी : खून प्रकरणातील आरोपीचा भिशी आणि व्याजाच्या पैशांच्या वादातून मित्रांनीच गोळ्या झाडून खून केला. हा खून सिनेस्टाईल झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली. त्यांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सागर सर्जेराव शिंदे (वय ४१, रा. सांगवी) असे खून झालेल्याचे नाव आहे. योगेश शरद जगताप (वय ३०), ऋषिकेश राजू खरात (२७, दोघेही रा. संजय गांधी वसाहत, स्पायसर रस्ता, औंध) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शिंदे हा भिशी चालवायचा. तसेच व्याजाने देखील पैसे द्यायचा. ऋषिकेश खरात हा सागर शिंदे याच्यासोबत चारचाकी वाहन चालवायचा. तसेच सागर याचा मित्र असलेला योगेश जगताप हा सागरच्या भिशीचे पैसे वसूल करणे तसेच व्याजाच्या पैशांची वसुली करण्याचे काम करायचा. तसेच योगेश जगताप याने स्वत: देखील सागर याच्याकडून पैसे घेतले होते. मात्र, भिशीचे व व्याजाचे पैसे वेळोवेळी वसूल न करणे तसेच स्वत: घेतलेले पैसे देखील योगेश जगताप वेळेत परत करत नसल्याने सागर शिंदे व त्याच्यात वाद व्हायचा. यात सागर हा योगेश जगताप याला मारहाण देखील करायचा. याचा राग योगेश याला होता.
दरम्यान, बुधवारी (दि. २३) सायंकाळी सागर शिंदे, ऋषिकेश खरात आणि यागेश जगताप हे तिघेही चारचाकी वाहनाने स्पायसर रस्त्याकडून सांगवी फाट्याकडे आले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे ते सांगवी फाटा येथून परत स्पायसर रस्त्याकडे गेले. थोड्यावेळाने ते पुन्हा चारचाकी वाहनातून सांगवी फाट्याकडे आले. त्यावेळी ऋषिकेश खरात चारचाकी चालवत होता. त्याच्या शेजारी सागर शिंदे बसला होता. तर त्यांच्या मागच्या बाजूला योगेश जगताप बसला होता. त्यावेळी देखील सागर आणि योगेश यांच्यात गाडीमध्येच वाद झाला. त्यावेळी सागर याने त्याच्याकडील पिस्तूल याेगेश जगताप याच्या डोक्याला लावले. त्यात झटापट होऊन सागर याच्या हातातील पिस्तूल गाडीत खाली पडले. ते पिस्तूल योगेश याने उचलून सागर याच्यावर गोळी झाडली. त्यामुळे सागर गंभीर जखमी झाला. या प्रकारामुळे ऋषिकेश खरात याचा वाहनावरील ताबा सुटला. सांगवी फाट्याकडून रक्षक चौकाकडे जात असताना भारत इलेक्ट्रानिक्स कंपनीच्या प्रवेश व्दाराजवळ पदपथाला गाडी धडकली. यात गाडीचे टायर फुटून गाडी बंद पडली. त्यावेळी जखमी सागर याने गाडीतून बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी योगेश जगताप आणि ऋषिकेश खरात हे दोघे देखील गाडीतून बाहेर आले. त्यानंतर पुन्हा सागर याच्यावर दुसरी गोळी झाली. यात सागर हा रक्तबंबाळ झाला. ते पाहून योगेश आणि ऋषिकेश हे दोघे तेथून पळून गेले.
जीव वाचविण्यासाठी आटापिटा
जखमी अवस्थेतील सागर याने जीव वाचविण्याचा आटापिटा केला. त्यासाठी तेथील एकाच्या दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठा रक्तस्त्राव झाल्याने व गंभीर जखमी झाल्याने त्याला दुचाकी घेऊन जाणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सागर याला सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले.
शवविच्छेदनात मिळाली एक गोळी
सागर शिंदे याच्यावर एक पाठीमागून व एक समोरून अशा दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्याच्या शरिरात रुतली. शवविच्छेदनावेळी ती गोळी काढण्यात आली. तर एक गोळी घटनास्थळी मिळून आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी व दरोडा विरोधी पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी खून केल्याचे पोलिसांना सांगितले.
पिस्तुलाचा धाक दाखवला अन्...
सागर शिंदे याने योगेश जगताप याला पिस्तुलाचा धाक दाखवला. मात्र, अचानक चित्र पालटले. तेच पिस्तूल योगेशच्या हाती लागले आणि सागरवर गोळीबार झाला. सागर शिंदे हा खून प्रकरणातील आरोपी होता.