पिंपरी : एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तिकीट काढून प्रवास करणे सक्तीचे आहे; परंतु काही महाठग पैसे वाचविण्याच्या नादात तिकीट न काढता प्रवास करतात. अशा महाठगांकडून पुणे जिल्ह्यातील एसटी प्रशासनाकडून चार महिन्यांत एक लाख ५ हजार रुपये दंड वसूल केला.
गेल्या काही दिवसांपासून निर्बंध हटविण्यात आल्याने सर्व ठिकाणी गर्दी वाढत आहे. यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात भरही पडत आहे; परंतु या गर्दीच्या काळात फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे. त्यामुळे अशा प्रवाशांकडून तिकीट चेकरकडून दंड वसूल करण्यात येत आहे. प्रसंगी तिकीट काढून प्रवास करण्यात यावी, अशा प्रकारे सल्लादेखील देण्यात येत आहे.
८२ फुकटे प्रवासी सापडले
एसटीच्या पथकाकडून करण्यात आलेल्या तपासणीत गेल्या चार महिन्यांत ८२ फुकटे प्रवासी सापडले आहे. त्यांच्याकडून एक लाख ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
गर्दीच्या वेळी घेतात फायदा
गेल्या महिन्यात गणपती उत्सव असल्याने सर्व गाड्या भरून जात होत्या. या काळात एसटीत प्रवासी संख्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने काही महाठग तिकीट न काढता प्रवास करत असल्याचे दिसून आहे. अशा प्रवाशांकडून वेळी दंडदेखील करण्यात आला आहे.
सर्व मार्गांवर तपासणी पथक
दोन वर्षांनतर सर्वत्र मोकळे वातावरण आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या सण-उत्सवाचा काळ असल्याने एसटीमध्ये जास्त प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळे तिकीट तपासणी पथक सर्व मार्गांवर चेक करण्यासाठी तयार आहे. यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
फुकटे प्रवासी झाले डोकेदुखी
एसटीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढणे बंधनकारक आहे. तरीही काही प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवाशांकडून वेळोवेळी दंडदेखील वसूल करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष पथकदेखील नेमण्यात आले आहेत, तरीही काही केल्या फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी न होता ती वाढत आहे. त्यामुळे असे प्रवासी एसटी प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहेत.