पिंपरी : कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर कारवाई करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारे शुक्रवारी (दि. ११) विशेष मोहीम राबवून १९५ बुलेटस्वारांवर कारवाई केली. सायलेन्सर बदलून कानठळ्या बसवणारा आवाज काढणाऱ्या या वाहनचालकांवर एक लाख ९९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ही कारवाई झाली.
शहरातील ध्वनी प्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडूनही फटाके वाजविणे, डीजे यावर निर्बंध लागू केले आहेत. मात्र, सायलेन्सचा फटाका वाजवण्याचे प्रकार बुलेटस्वारांकडून सुरू आहेत. अशा बेशिस्त बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दिवाळीच्या काळात देखील अशा बुलेटस्वारांवर मोठी कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा विशेष मोहीम राबवून बुलेटस्वारांना वाहतूक पोलिसांनी दणका दिला.
वाहनात फेरफार करणे भोवलेदुचाकी तसेच चारचाकी वाहनांची सजावट करताना काही जणांकडून वाहनांच्या मूळ स्वरुपात बदल केला जातो. यासाठी काही पार्टस् बदलून फेरफार केला जातो. त्यामुळे वाहनाच्या मूळ रचनेत बदल होतो. परिणामी ध्वनी व वायू प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे वाहनाच्या मूळ रचनेत बदल करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. अशा वाहनचालकांवर पोलिसांकडून कावाई केली जाते.
सायलेन्सर बदलल्याप्रकरणी बुलेटस्वारांवर केलेली कारवाई :वाहतूक विभाग - केसेस - दंड (रुपयांमध्ये) - २७९ प्रमाणे खटलेसांगवी - २५ - २५०००हिंजवडी - १५ - १५०००निगडी - ३३ - ३३०००चिंचवड - २ - २०००पिंपरी - १२ - १२०००भोसरी - ४० - ४००००चाकण - १५ - १५०००देहूरोड - २ - २०००दिघी -आळंदी - -- -- २तळवडे - ८ - ८०००वाकड - २२ - २८५००तळेगाव - १० - १००००म्हाळुंगे - ४ - ४०००बावधन - ५ - ५०००
वाहनचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. नियम उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येत आहे. सायलेन्सर बदलून काही बुलेटस्वार फटाक्यासारखा कर्णकर्कश्श आवाज करतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना त्रास होतो. शांततेचा भंग होतो. तसेच इतर वाहनचालक विचलीत होऊन अपघाताचा धोका असतो. त्यामुळे असे प्रकार टाळावेत.- सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड