पिंपरी : एकाच चारचाकी वाहनामधून प्रवास करत असलेल्या मित्रांनी वाहनामधील एका मित्रावर गोळ्या झाडल्या. यात त्याचा मृत्यू झाला. सांगवी येथील रक्षक चौकात भारत इलेक्ट्रिक कंपनीसमोर बुधवारी (दि. २३) सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली.
सागर सर्जेराव शिंदे (वय ४६, रा. सांगवी) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत सागर शिंदे आणि आरोपी चारचाकीमधून सांगवी येथील रक्षक चौकात आले. पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी पिस्तुलातून सागर शिंदे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात सागर यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सागर शिंदे यांचा मृतदेह ससून रुग्णालयात हलविण्यात आला.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता गोळी झाडून खून केल्याचे त्यांनी सांगितले, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, खुनाचे नेमके कारण काय, खून कसा केला, सागर यांच्यावर वाहनामध्ये असतानाच गोळ्या झाडल्या की वाहनातून बाहेर आल्यानंतर गोळ्या झाडल्या याबाबत पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
खुनाचा गुन्हा दाखल
खून प्रकरणी सागर शिंदे याच्याविरोधात सन २०१३ मध्ये चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच सांगवी पोलिस ठाण्यात देखील एक गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.