पिंपरी : हॉटेलमध्ये ऑर्डर दिलेल्या मटण सूपमध्ये भाताचे कण होता म्हणून दोघा तरुणांनी हॉटलच्या वेटरला लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केला. या वेटरच्या मदतीसाठी आलेल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या इतर चार कर्मचाऱ्यांना देखील या दोघा तरुणांनी मारहाण केली. हत्या झालेल्या वेटरचे नाव मंगशे कोस्ते (वय १९, मुळ रा. जालना) असे आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) रात्री पिंपळे सौदागर येथे घडली. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पुनीत सचदेव, विजयराजे वाघेरे (रा.पिंपरी) या दोघांना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पिंपळे सौदागर येथील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी मटण सूप मागवले असता त्यामध्ये भाताचा कण आला. यावरून त्यांची वेटरशी भांडण झाले. या भांडणात एका आरोपीने लाकडी दांडका आणून मंगेशच्या कानाच्या मागे मारला. या मारहाणीत मंगेशचा मृत्यू झाला. आरोपीनां थांबवण्यासाठी हॉटेलमधील इतर चार जणांनी प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली.