पिंपरी : बिअरचे पैसे मागितल्याने पाच जणांच्या टोळक्याने वाहनाची तोडफोड करत राडा केला. तसेच हाॅटेल व्यावसायिकाला मारहाण केली. ‘‘आम्ही कासारवाडीचे भाई आहोत, आमची पोलिसांमध्ये तक्रार केली तर तुझे हाॅटेल चालू देणार नाही’’, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. कासारवाडी येथील केशवनगरमध्ये वरुण रेस्टो बार येथे रविवारी (दि. २८) रात्री आठ ते साडेबाराच्या दरम्यान हा प्रकार घडला.
अमृत अण्णय्या शेट्टी (३६, रा. शास्त्रीनगर, कासारवाडी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २९) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ऋषिकेश उर्फ मुंगळ्या विश्वनाथ मोटे (२०, रा. कासारवाडी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह अरमान कपील देशमुख (२१), राेहीत कदम, अभी मोरे, शिवा पवार (सर्व रा. कासारवाडी) यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमृत यांच्या वरुण रेस्टो बारमधून अरमान, रोहीत आणि अभी यांनी पाच बिअर घेतल्या. मात्र, बिअरचे पैसे न देता हाॅटेलमधून निघून गेले. याबाबत अमृत यांनी अरमान याच्या वडिलांना सांगितले. त्याचा राग येऊन अभी मोरे याने हाॅटेलचा व्यवस्थापक सुरक्षित देशमुख याला धमकी दिली. तुमने अरमानके पिताजीको फोन करके हमारी कम्प्लेंट किया है ना, देखो आज रात १२ बजे अतृतको मारके हाॅटेल जला देंगे, अशी धमकी दिली.
फिर्यादी अमृत हे त्यांच्या हाॅटेलच्या पाठीमागे चारचाकी वाहन पार्क करत असताना अरमान रोहीत आणि अभी मोरे हे दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी अमृत यांना शिवीगाळ केली. माझी वडिलांकडे तक्रार करतो का, आता तुला दाखवितो, मी कासारवाडीचा भाई आहे, माझ्याकडे पैसे मागतो काय, थांब आता तुला दाखवितो, अशी धमकी देत अरमान याने फिर्यादी अमृत यांच्या खिशातील दोन हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच त्यांना मारहाण केली. त्यानंतर अमृत यांच्या चारचाकी वाहनाची लाेखंडी राॅड, लाकडी दांडके आणि दगडाने तोडफोड केली. आम्ही कासारवाडीचे भाई आहोत, आमची पोलिसांमध्ये तक्रार केली तर आम्ही तुझे हाॅटेल चालू देणार नाही, अशी धमकी देत त्यांनी फिर्यादी अमृत यांना शिवीगाळ केली. पोलिस उपनिरीक्षक मारुती मदेवाड तपास करीत आहेत.