चिंचवड : भोसरीतील उड्डाणपुलावरून मोशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एक तरुण मांजाचा फास बसल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे घातक ठरणाऱ्या मांजा विक्रीचा मुद्दा समोर आला आहे.
शहरात नायलॉन मांजामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या मांजाचा फास बसल्याने काहींना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. चिंचवडमधील एक तरुण सायंकाळी सहा वाजता भोसरीमधून मोशीकडे दुचाकीवरून जात असताना अचानक त्याच्या गळ्याभोवती मांजा अडकला. मांजामुळे गळ्याभोवती फास बसला. मांजा काढताना हाताचा अंगठा फाटला. रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी असतानाही अशा प्रकारचा मांजा बाजारात उपलब्ध होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नायलॉन मांजा विक्रीबाबत पोलिसांनी कठोर कारवाई करणे महत्त्वाचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.