पिंपरी : मोईतील बांदलवस्ती येथील मोरया कॉलनीत सर्पमित्रांनी दुर्मीळ जातीच्या सापाला जीवदान दिले. रसल्स कुकरी हे त्याचे नाव आहे. त्या सापाला सुरक्षितपणे पकडून सर्पमित्रांनी निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले आहे.
मोई येथील अनिकेत चौरे यांच्या घराच्या परिसरात हा साप आढळून आला होता. सर्पमित्र ओमकार देशमाने यांना शनिवारी रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास चौरे यांच्या घराच्या परिसरात एक साप आढळला आहे, अशी माहिती मिळताच ओमकार देशमाने, शंभू लोंढे, निखिल गाडेकर हे चौरे यांच्या घरी गेले. त्यांनी सुरक्षितपणे हा साप पकडला.
ओमकार देशमाने म्हणाले, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, एस. तुर्कमेनिस्तान येथे हा साप आढळतो. मात्र, पुणे किंवा इतर परिसरात आजपर्यंत आढळलेला नाही. त्याचा नैसर्गिक अधिवास वेगळा आहे. त्याचे मराठी नाव रसल्स कुकरी आणि इंग्रजी नाव 'स्ट्रीक्ट कुकरी' आणि शास्त्रीय नाव 'ऑलिगोडॉन टेनिओलॅटस' असे आहे. या सापाला निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. अचानक हवामानाच्या बदलानुसार उष्णता वाढल्यामुळे गारवा मिळेल अशा ठिकाणी सरपटणारे जीव निवारा शोधत आहेत. जमीन तापल्याने हे जीव अनेकदा घरात ओलावा असलेल्या ठिकाणी आढळून येतात.