पिंपरी : सराईत गुन्हेगार पवन लष्करे याच्या खुनाचा बदला घेण्याबाबत, त्याच्या एका मित्राने ‘तेरी मौत का बदला हम जरूर लेंगे,’ असे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले. हे स्टेटस ठेवणे मित्राला महागात पडले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अर्जुन भीमराव वंजारी (वय २४, रा. शरदनगर, चिखली) याला अटक केली असून त्याचा साथीदार आतिष काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मोहसीन शेख यांनी फिर्याद दिली आहे.
सराईत गुन्हेगार पवन लष्करे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या टोळीतील अतिश काळे याने एक व्हिडिओ बनवला, त्यात ए दोस्त अपनी दोस्ती की मिसाल एक ना एक दिन जरूर देंगे, चाहे कितने भी दिन गुजर जाए तेरी मौत का बदला हम जरूर लेंगे, असा मजकूर होता. तो व्हिडिओ अर्जुन वंजारी याने स्टेट्सला ठेवला होता. तो निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.