पिंपरी : भरधाव बसने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर बसचालक पळून गेला. हा अपघात शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास तळवडे चौक, देहू-आळंदी रोडवर घडला. माधुरी दत्तात्रय घोडके (वय २२) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
देहूरोड पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दत्तात्रय महादेव घोडके (वय ५२, रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांची मुलगी माधुरी घोडके देहू-आळंदी रस्त्याने पायी चालत जात होती. तळवडे चौकात आल्यानंतर तिला एका खासगी बसने धडक दिली. या अपघातात माधुरी गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर माधुरीला रुग्णालयात न नेता बसचालक पळून गेला.
पादचारी असुरक्षित
शहरातील मोठमोठ्या रस्त्यांवर फुटपाथ असूनही पादचारी असुरक्षित असल्याचे दिसू लागले आहे. फुटपाथवर व्यावसायिकांचे अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चहलावे लागत आहे. त्यामुळे अशा अपघातात पादचाऱ्यांना जीवच गमवावा लागत आहे.
बेजबाबदार बसचालक
बसचालक अत्यंत बेजबाबदारपणे बस चालवताना दिसू लागले आहेत. रस्त्याचा अंदाज न घेता वाहन चालवल्याने बसचे नियंत्रण सुटत आहे. त्यामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे. अशा बस चालकांवर कारवाई होणार का? याबाबत अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.