पिंपरी : गटारी अमावास्येनिमित्त पार्टी करायला नदीकडेला मोकळ्या मैदानात बसलेल्या तरुणांच्या गटामध्ये कानाखाली चापट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून नऊजणांच्या टोळक्याने एकाच्या पोटावर चाकूने वार करून खून केला, तर अन्य दोघांवर जीवघेणा हल्ला केला. यापैकी एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि.२८) रात्री साडेसातच्या सुमारास वाकड गावठाण येथे घडली.
दीपक भगवान गायकवाड ऊर्फ खंडू (वय १९, रा. म्हातोबानगर, वाकड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर लखन अंकुश लगस (२२, रा. म्हातोबा नगर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आदित्य अशोक थोरात (१९, रा. पॉलाराईस हॉस्पिटल जवळ, वाकड) याने फिर्याद दिली, तर सुमित सावंत (२१), अमोल देशमुख (२४), अभिषेक ऊर्फ नंदू कांबळे (२०), सुजित लोंढे (१८), आशिष भिसे ऊर्फ मर्फी, ब्रम्हा जाधव (२०), महेश जाधव (२४), सौरभ जाधव (१८) यांच्यासह एका १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील मुळा नदीकाठी मोकळ्या मैदानात दीपक गायकवाड आणि आरोपी हे दोन वेगवेगळया ग्रुपमध्ये गटारी साजरी करत होते. दुपारी दीपक गायकवाड याने सुजित लोंढे याला कानाखाली चापट मारली. त्याने ही बाब अन्य मित्रांना सांगितली. तेव्हा हे सर्वजण तिथून निघून गेले. सायंकाळी सातच्या सुमारास ते सर्वजण वाकड गावठाण येथे थांबले. काही वेळाने दीपक जवळ येताच टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातीला दगड-विटाने मारहाण केली. नंतर एकाने वाहनामधील चाकू काढून दीपकच्या पोटावर वार केले, तर लखन लगस याच्या डोके, हात व पोटावर वार करण्यात आले. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.