पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी याद्यांचा घोळ शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान ४३ नगरसेवकांना उमेदवारी देताना काही नगरसेवकांचे पत्ते कट केले. काँग्रेसने दोन विद्यमान नगरसेवकांना उमेदवारीसह ७० जागा लढविल्या आहेत. भाजपाने मूळ कार्यकर्त्यांना टाळून राष्ट्रवादीतून आयारामांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. १२८ जागा आणि ३२ प्रभागांची निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८२ पैकी १७ नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. तर काँग्रेसच्या १३ पैकी १०, शिवसेनेच्या १५ पैकी ४, मनसेच्या ४ पैकी २, नऊ अपक्षांपैकी २ नगरसेवकांनी राजीनामा दिला. एकूण ३३ नगरसेवकांनी राजीनामा देऊन पक्षांतर केले. शेवटच्या घटकापर्यंत यादीचा घोळ सुरू होता. उमेदवारांची पळवापळवी सुरू होती. त्यामुळे भाजपाने रात्री उशिरापर्यंत यादी माध्यमांना दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर शकुतला धराडे यांच्यासह ४३ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसमधून आलेल्या सात जणांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दोन विद्यमान नगरसेवकांसह ७० जागांची यादी जाहीर केली आहे. त्यात नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. शिवसेनेने सर्वच नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे. तीनही पक्षांत नवीन चेहरे अधिक आहेत. तसेच भाजपाने अन्याय केल्याचा दावा रिपब्लिकन पक्षाने केला आहे. वीस जागांपैकी केवळ चार जागा दिल्याने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. (प्रतिनिधी)भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांचे पत्ते कटभाजपाने माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्यासह प्रदेश प्रतिनिधी महेश कुलकर्णी, मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, स्वाती काटे, प्रकाश जवळकर, अमोल थोरात, दीपक जाधव या जुन्या कार्यकर्त्यांची उमेदवारी कापली आहे. उमेदवारी यादी माध्यमांना देण्यास टाळाटाळ करण्यात आली. निष्ठावंतांना डावलल्याने भाजपात अस्वस्थता आहे. सर्वच पक्षांनी घराणेशाहीला काही प्रमाणात प्राधान्य दिल्याचे यादीवरून दिसून येत आहे. तसेच उमेदवारी मिळणार नसल्याने राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा सुजाता पालांडे यांनी भाजपातून उमेदवारी स्वीकारली, तर क्रीडा समितीचे माजी सभापती जितेंद्र ननावरे यांनी ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे.
भाजपात आयारामांना उमेदवारी
By admin | Published: February 04, 2017 4:12 AM