पिंपरी : लग्नाच्या बोहल्यावर जाण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांची आरती केली. तो व्हिडीओ शिवजयंती निमित्त सोशल मिडीयावर टाकला अन क्षणार्धात व्हायरल झाला. मोशीतील संतनगर येथील किर्ती दौंडकर आणि अजिंक्य वीर यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.
नोव्हेंबर मध्ये किर्ती आणि अजिंक्य यांचा विवाह झाला. किर्ती या आर्किटेक्ट आहेत. तर अजिंक्य इंजिनियर आहेत. विवाहाच्या वेळी बोहल्यावर जाण्याआधी शिवाजी महाराजांची आरती करून त्यांनी लग्न करण्याचा निर्धार केलेला. सरासरी विवाहाच्या वेळी वधु-वर लग्नमंडपात महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन करूनच बोहल्यावर जातात. मात्र, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन न करता महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांची आरती केली. त्यावेळचा व्हिडीओ शिवजयंतीनिमित्त शनिवारी (दि.१९) फेसबुक अपलोड केला. व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तासाभरात तो व्हायरल झाला.
महाराजांचे व्यक्तिमत्व डोक्यावर नाही तर डोक्यात घेणे गरजेचे
''छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्त्व डोक्यावर नाही तर डोक्यात घेणे गरजेचे आहे. सहजीवनाची सुरूवात करतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोक्यात ठेवूनच करायची असा माझा अट्टाहास होता. हा विचार घरच्यांना बोलवून दाखविला अन त्यांनीही होकार दिला. ज्या ठिकाणी लग्न होते. त्यांनाही ही संकल्पना आवडली असल्याचे किर्ती दौंडकर-वीर यांनी सांगितले.''
महाराजांकडून प्रेरणा घेवून सहजीवनाची सुरूवात आम्ही केली
''शिवाजी महाराज माणूसपणाच्या उंचीवर आहेत म्हणून आजही त्यांचे नाव घेताच रक्त सळसळून उठते. प्रचंड प्रेरणेची ताकद निर्माण होते. एक माणूस इतके अफाट शौर्य गाजवू शकतो, हा विचार पराकोटीचे सामर्थ्य देणारा आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांनी अनेक महापुरुषांना प्रेरणा दिली. लढण्यासाठी, झगडण्यासाठी नैतिक व आत्मिक बळ दिले. स्वतः महाराजांना स्वराज्य उभे करताना अनंत अडचणी आल्या. त्यावर त्यांनी मात करत रयतेचे स्वराज्य उभे केले. त्यांची प्रेरणा घेवून सहजीवनाची सुरूवात आम्ही केली. आज सकाळी इंन्स्टाग्राम-फेसबुकवर स्टोरी टाकली. अन ती व्हायरल झाली. त्यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी. एवढीच अपेक्षा आहे असे अजिंक्य वीर यांनी सांगितले.''