पुणे : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबरच इतर राजकीय नेतेही नाराजी व्यक्त करू लागले आहेत. त्यावरून शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. अब्दुल सत्तार यांनी टीका करताना चुकीचा शब्द वापरला असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. ऑटो क्लस्टर चिंचवड येथील औद्योगिक प्रदर्शनास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पन्नास खोक्यावरुन टीका केली होती. "पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? असा सवाल सुळे यांनी सत्तार यांना केला होता. यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुळे यांनी प्रतिक्रिया देताना तुमच्या पन्नास खोके आले असतील म्हणूनच तुम्ही आम्हाला ऑफर करत आहात, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिले. या प्रत्युत्तराला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. त्यावरून सामंत म्हणाले, मी त्या शब्दाचे समर्थन करत नाही. राजकारणात आरोप -प्रत्यारोप होत असतात. मात्र, अब्दुल सत्तार यांनी टीका करताना चुकीचा शब्द वापरला आहे.