पिंपरी : शहरामध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र, कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे. ‘सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोझर फिरविला जातो; तर दुसरीकडे कारवाई करण्याची मागणी करूनही सत्ताधारी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या अनधिकृत दुकानांवर व घरांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.पिंपळे गुरव, सांगवी परिसरातील भाजपा नेते, लोकप्रतिनिधींच्या व्यावसायिक बांधकामांकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यांची बांधकामे शाबूत ठेवून सर्वसामान्यांच्या रहिवासी बांधकामावर बुलडोझर फिरविला जात आहे. महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप राजकीय पक्षांनी केला आहे. अनधिकृत बांधकामाचे पुरावे दिल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली आहे. पिंपळे गुरवमधील सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर बुलडोझर फिरविला जात आहे. दुसरीकडे नागरिकांनी लेखी तक्रार करून, तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊनही पिंपळे निलख, विशालनगरमधील बेकायदापणे उभारलेल्या एका वाईन शॉपवर कारवाई केली जात नाही. हे दुकान भाजपाकडून निवडणूक लढविलेल्या एका व्यक्तीच्या मालकीचे असल्यानेच तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.गोरगरिबांच्या घरांवर हातोडाशहराध्यक्ष साठे म्हणाले, ‘‘महापालिकेत सुडाचे राजकारण सुरू आहे. सत्ताधारी लोक प्रशासनास हाताशी धरून नागरिकांवर जुलूम करीत आहेत. प्रशासन सत्ताधाºयांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नाही. केवळ गोरगरिबांच्या घरांवर हातोडा चालवीत आहे. प्रशासनाच्या या कारवाईतील दुजाभावाचा आम्ही निषेध करतो.’’
सत्ताधा-यांच्या बांधकामांना अभय; प्रशासन कारवाईत दुजाभाव करत असल्याची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 3:38 AM