सुवर्णा नवले, पिंपरी आदिवासी पाड्यांवर जाऊन ध्येयवेड्या शिक्षकाने त्यांच्यासारखा पोशाख परिधान केला. या समाजाला आपलेसे करून घेतले. अगदी त्यांना अंघोळी घालण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंतची कामे या शिक्षकाने केली. त्यांच्यासाठी स्वत:च्या पैशातून सहलीचे आयोजन केले. झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तेथील मुलांचे संस्कारवर्ग भरवले.‘खरे समाजकार्य हे इतरांना घडविण्यात आहे,’ हे जणू काही त्यांना अवगतच होते. स्वत:च्या कुटुंंबाचा उदरनिर्वाह होईल एवढे कमवणे पुरेसे आहे, असे त्यांचे मत होते. म्हणूनच कधीही स्वत:चा विचार न करता फक्त समाजाची आस लागलेली होती. तीशीत सत्यात उतरविण्याचा प्रयत्न या शिक्षकाने केला आहे. ज्या हाल-अपेष्टा आपल्या वाट्याला आल्या, त्या इतरांना मिळू नये, यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा अट्टाहास या तरुणाने धरला होता. मार्च २००५पासून मावळ तालुक्यातील आंबेगावात विद्यादानाचे काम हा शिक्षक करीत आहे.शाळेत आदिवासी मुलांची उपस्थिती कमी असायची, हे सारखे मनात सलत राहायचे. शाळेचा पट वाढावा म्हणून या आदिवासीच्या मुलांच्या घरी जाऊन खेकडेही पकडले. त्यांना शाळेची आवड लागावी म्हणून त्यांच्यासारखे काही दिवस राहिले. कालांतराने हळूहळू शिक्षणाची आवड त्यांच्यात निर्माण केली. या मुलांना स्वत:च्या खिशातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. होतकरू असणाऱ्या सविता नावाच्या विद्यार्थिनीला आठवीत प्रवेश मिळवून दिला. काले येथील पवना विद्यामंदिरातील आदिवासी मुलांची फी स्वत: भरली. शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून आंदर मावळात जाऊन आदिवासी मुलांना वह्यांचे वाटप केले. या भागातील मुलांना संगणक कसा असतो हे माहीत नव्हते, तेव्हा या शिक्षकाने एका संस्थेतून संगणकासाठी धडपड करुन मदत मिळविली. व संगणकाची माहिती शाळेत त्यांना देण्यास सुरुवात केली. त्यातील काही बालकांसाठी बूट आणले. वाढदिवस स्वत: चा कधीही साजरा न करता त्या पैशांतून अनाथांसाठी फळांचे वाटप केले. स्पर्धा परीक्षेची पुस्तके खरेदी केली. त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम या शिक्षकाने केले.
आदिवासींच्या शिक्षणासाठी झिजवले उंबरठे
By admin | Published: September 05, 2015 3:21 AM