पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे स्मार्ट सिटीत रूपांतर होत असले तरी, भटक्या व मोकाट कुत्र्यांचा त्रास काही कमी होताना दिसत नाही. कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिक जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील तब्बल ७० हजार भटक्या कुत्र्यांपैकी २५ टक्के म्हणजे सुमारे १७ हजार ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी शस्त्रक्रिया) करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.
शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात असल्याने नागरिकीकरण झपाट्याने होत आहे. शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या पुढे आहे. चारी बाजूस दाट लोकवस्ती निर्माण होत आहे. तसेच, खाद्यपदार्थाचे स्टॉल व हॉटेल व्यवसाय तेजीत आहेत. नागरिक व हॉटेल व्यावसायिक शिल्लक व खरखटे अन्नपदार्थ फेकून देतात. कचराकुंड्या हटविल्या तरी काही बेशिस्त नागरिक उघड्यावर कचरा व अन्न फेकून देतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना पुरेसा आहार मिळत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
निर्जन भागातून विशेषत: रात्रीच्या वेळी जात असताना ही मोकाट कुत्री नागरिकांवर धावून जातात. चावा घेतल्याने नागरिक विशेषत: लहान मुले जखमी होत आहेत. वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीवरून एका वर्षात सुमारे दहा हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.
दुसरीकडे पालिकेच्या नेहरूनगर येथील नसबंदी शस्त्रक्रिया विभागात दररोज १५ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात आहे. त्यात ८५ टक्के प्रमाण हे मादी कुत्रीचे आहे. पशुवैद्यकीय विभागाकडे असलेले तोकडे मनुष्यबळ, कमी संख्येचे कुत्र्यांचे पिंजरे व सुविधा आदी कारणांमुळे नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी आहे. शहरातील ७५ टक्के कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया झाल्याचे गृहीत धरल्यास उर्वरित १७ हजार ५०० कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी वेगात पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा शहरात कुत्र्यांची समस्या उग्र रूप धारण करू शकते.
नवीन पिंजरे सेवेत दाखल झाल्याने ही संख्या प्रतिदिन २८ ते ३० होणार आहे. यामुळे वार्षिक दहा हजारांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया शक्य होतील. सध्या महापालिका फीमेल डॉगवर शस्त्रक्रिया करण्यावर भर देत असून एकूण शस्त्रक्रियेच्या ९० टक्के शस्त्रक्रिया या फीमेल डॉगच्या होतात. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी आणखी किमान १०० पिंजरे गरजेचे आहेत. प्रतिदिन ५० नसबंदी शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. यासाठी येत्या सहा महिन्यांत आणखी १०० पिंजरे तयार केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.